‘होर्मुझ’साठी भीषण युद्धाची नांदी! अमेरिकेचा इशारा; इराणचा पलटवार, इस्रायलवर क्षेपणास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 05:53 IST2026-03-23T05:53:21+5:302026-03-23T05:53:30+5:30
आमच्याकडे युद्धासाठी भरपूर पैसा आहे, असे अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी म्हटले असून धमक्यांना थेट मैदानात उत्तर देऊ असे इराणने म्हटले आहे.

‘होर्मुझ’साठी भीषण युद्धाची नांदी! अमेरिकेचा इशारा; इराणचा पलटवार, इस्रायलवर क्षेपणास्त्र
दुबई : इराणने ४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग पूर्णपणे खुला करावा अन्यथा त्यांच्या वीजप्रकल्पांचा पूर्ण नाश करू, अशी धमकी शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली. या धमकीवर उत्तर देत, आमच्यावर कोणताही हल्ला झाल्यास अमेरिका व इस्रायलच्या ऊर्जा व पायाभूत सुविधांवर प्रतिहल्ला करू, असा इराणने रविवारी इशारा दिला. यामुळे परिस्थिती अधिक धोकादायक वळणावर गेली आहे.
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानुसार इराणमधील बुशेहर अणुऊर्जा प्रकल्प किंवा तेहरानजवळील दामावंद वायुप्रकल्प हे अमेरिकेचे लक्ष्य असू शकतात. आमच्याकडे युद्धासाठी भरपूर पैसा आहे, असे अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी म्हटले असून धमक्यांना थेट मैदानात उत्तर देऊ असे इराणने म्हटले आहे.
रविवारी सकाळी दक्षिण इस्रायलमधील एका अणुसंशोधन केंद्राजवळील डिमोना आणि अराड या दोन शहरांवर इराणने क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यात १२५ अधिकजण जखमी झाले आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले. हे हल्ले इतके जबर होते की, या दोन्ही शहरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
नतांझवरील हल्ल्यावर इस्रायलचा नकार
इराणच्या नतांझ या अणुकेंद्रावर शनिवारी हल्ला झाला; मात्र हा हल्ला आपण केला नाही, असे स्पष्टीकरण इस्रायलने दिले आहे. या अणुकेंद्रातून गळती किंवा किरणोत्सर्ग झाला नाही, असे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने म्हटले आहे.
हिजबुल्लाहचा उत्तर इस्रायलवर हल्ला
लेबनॉनमधील इराणसमर्थक हिजबुल्ला या बंडखोर संघटनेने रविवारी उत्तर इस्रायलमधील मिसगाव आम येथे हल्ला केला. असून, त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हिजबुल्लाहने सुरू झालेल्या संघर्षानंतर इस्रायलवर हल्ले सुरू केले आहेत.
सौदी अरेबियाने क्षेपणास्त्रे, ड्रोन पाडले
इराणने रविवारी पहाटे राजधानी रियाधच्या दिशेने डागण्यात आलेल्या तीन क्षेपणास्त्रांपैकी एक हवेतच निष्प्रभ करण्यात आले, तर उर्वरित दोन निर्जन भागात पडली. याशिवाय पूर्वेकडील भागाकडे येणारी सहा ड्रोनही पाडली. तसेच शारजाहपासून १५ समुद्री मैल अंतरावर एका मालवाहू जहाजाजवळ प्रोजेक्टाइल पडून स्फोट झाला. या जहाजावरील कर्मचारी सुरक्षित आहेत.
रुग्णांचे स्थलांतर
इराणच्या अँडिमेशक शहरातील इमाम अली रुग्णालयावर हवाई हल्ल्यानंतर मोठे नुकसान झाले असून, रुग्णांना अन्य शहरांत हलवण्यात आले. शहरातील एकमेव रुग्णालयावर हल्ला झाल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.
कतार किनाऱ्याजवळ हेलिकॉप्टर दुर्घटना; ६ ठार
कतारच्या अंतर्गत मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी एक हेलिकॉप्टर कोसळून सहाजणांचा मृत्यू झाला, तर एकजण बेपत्ता आहे. संरक्षण मंत्रालयाने या अपघातामागे तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचे सांगितले. मृतांची ओळख किंवा ते नागरी की लष्करी होते, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
श्रीलंकेत इंधनदरात २५ टक्के वाढ
जागतिक स्तरावर वाढलेल्या तेलकिमतींमुळे श्रीलंकेच्या सरकारने इंधनदरात सुमारे २५ टक्क्यांनी वाढ केली आहे. गेल्या दोन आठवड्यांतील ही दुसरी वाढ असून, युद्ध सुरू झाल्यापासून इंधनदर एकूण एक-तृतीयांशाने वाढले आहेत. इंधनटंचाईमुळे देशात कडक रेशनिंग, आठवड्यातील एक दिवस शाळा-कार्यालये बंद ठेवण्याचे निर्णय घेतले आहेत.