ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 08:16 IST2025-04-22T08:15:10+5:302025-04-22T08:16:08+5:30
Harvard University Donald Trump: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्डबद्दल घेतलेल्या भूमिकेने अमेरिकेत नवा संघर्ष उभा ठाकला आहे. ट्रम्प प्रशासनाने विद्यापीठासंदर्भात घेतलेल्या एका निर्णयावरून हा वाद उफाळला आहे.

ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
Harvard University Donald Trump News: आधीच टॅरिफच्या मुद्द्यावरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जनतेचा विरोध होत असताना आता हार्वर्ड विद्यापीठ प्रशासन आणि प्राध्यापक, कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार विद्यापीठाचे अध्यक्ष एलन. एम. गार्बर यांनी ट्रम्प प्रशासनाकडून गैरमार्गाने विद्यापीठावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी विद्यापीठाचा निधी थांबवण्याची धमकी दिली होती. प्रशासनाने स्थगिती दिल्यानंतर आता हार्वर्ड विद्यापीठाने थेट न्यायालयात ट्रम्प सरकारविरोधात खटला भरला आहे. त्यामुळे अमेरिकेत नवा संघर्ष यानिमित्ताने उफाळून आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले होते की, "हार्वर्ड विद्यापीठ मुर्खांची आणि द्वेष पसरवणाऱ्यांची जागा बनली आहे. हे विद्यापीठा डाव्यांचा (कम्युनिस्ट) गड असल्याचे सांगितले जाते. २३ ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायलने गाझा पट्टीत हल्ले केले होते. त्यावेळी हार्वर्ड विद्यापीठात त्याविरोधात आंदोलन झाले होते."
हेही वाचा >> टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
"हे विद्यापीठ ज्यूंबद्दल विरोधी प्रचार, प्रचार करत आहे आणि मुस्लिमांप्रति मवाळ भूमिका घेते. या विद्यापीठात गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश दिले जात नाही. त्यामुळे या विद्यापीठाचा आपण निधी रोखू", अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती.
ट्रम्प प्रशासनाने निधी रोखला
सरकारकडून विद्यापीठाला दिल्या जाणाऱ्या निधीसंदर्भात ट्रम्प प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या प्रशासनाने हार्वर्डला दिला जाणाऱ्या २.२ बिलियन निधीला स्थगिती दिली. त्यानंतर विद्यापीठ आणि ट्रम्प प्रशासन आमने-सामने आले आहे.
हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी ट्रम्प प्रशासनाविरोधात एकवटले आहेत. विद्यार्थीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. हार्वर्ड विद्यापीठाने आता ट्रम्प प्रशासनाला कोर्टामध्ये खेचले आहेत.
ट्रम्प प्रशासनावर गंभीर आरोप
विद्यापीठाचे अध्यक्ष गार्बर यांनी ट्रम्प प्रशासनाकडून विद्यापीठातील निर्णय नियंत्रण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. "मी एक ज्यू आहे आणि अमेरिकन म्हणून हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की, ज्यू विरोधातील वाढत्या रोषाबद्दल व्यक्त केल्या जाणाऱ्या चिंता योग्यच आहेत. पण, सरकारने कायदेशीरपणे विद्यापीठाशी समन्वय ठेवला पाहिजे", गार्बर म्हणाले.
"प्रशासनाने विद्यापीठ नियंत्रण करण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही कुणाची नियुक्ती करतो आणि काय शिकवतो, हे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नये", असे गार्बर यांनी म्हटले आहे.
विद्यापीठ प्रशासनाने मॅच्युसेट्स न्यायालयात ट्रम्प प्रशासनाविरोधात याचिका दाखल केली आहे. 'ट्रम्प प्रशासन अभ्यासक्रम, नियुक्त्यांच्या प्रक्रियेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला आहे.