संघर्ष आणखी चिघळणार; मध्य पूर्वेतील देशांचा इस्रायल, अमेरिका व तिच्या मित्रराष्ट्रांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 06:09 AM2023-10-19T06:09:52+5:302023-10-19T06:10:05+5:30

जर्मनीची राजधानी बर्लिन येथील ज्यूंचे प्रार्थनास्थळ असलेल्या सिनेगॉगवर बुधवारी अज्ञात व्यक्तींनी फायरबाॅम्बने हल्ला केला.

The conflict will intensify; Middle East countries warning to Israel, America and its allies after gaza hospital attack | संघर्ष आणखी चिघळणार; मध्य पूर्वेतील देशांचा इस्रायल, अमेरिका व तिच्या मित्रराष्ट्रांना इशारा

संघर्ष आणखी चिघळणार; मध्य पूर्वेतील देशांचा इस्रायल, अमेरिका व तिच्या मित्रराष्ट्रांना इशारा

कैरो : गाझा येथील रुग्णालयावरील हल्ल्यात झालेल्या मोठ्या प्राणहानीमुळे मध्य पूर्वेतील देशांत संतापाची लाट उसळली आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा वणवा आणखी भडकू शकतो, असा इशारा मध्य पूर्वेतील देशांनी अमेरिका व तिच्या मित्रराष्ट्रांना दिला आहे.

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल् सिसी, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे, पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबतची शिखर परिषद रद्द केली. त्यामागे इस्रायलबद्दल मध्य पूर्वेच्या देशांमध्ये असलेला राग हेच महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ॲन्टोनी ब्लिंकन यांनी गेल्या आठवड्यात इस्रायलचा दौरा केला होता. त्यावेळी मध्य पूर्वेतील देशांच्या मनात इस्रायलबद्दल असलेला राग त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला होता. पण, गाझातील रुग्णालयावरील हल्ल्यानंतर या देशांचा राग कमी होण्याऐवजी आणखी वाढला आहे. 

जॉर्डनमध्ये उग्र निदर्शने
मध्य पूर्वेतील देशांमध्ये इस्रायलविरोधात निदर्शने सुरू असून त्याचे प्रमाण आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या तज्ज्ञांचे मत आहे. जॉर्डनमध्ये इस्रायलविरोधात निदर्शने आणखी तीव्र झाली आहेत. त्याचे लोण इतर देशांतही पसरत आहे. काही इस्रायली दूतावासांवर पॅलेस्टाइन समर्थकांनी मोर्चे काढल्याचेही प्रकार घडत आहेत. 

गाझावरील हल्ल्यामागे इस्रायल नाही : बायडेन 
गाझा पट्टीतील हॉस्पिटलमध्ये झालेला स्फोट इस्रायलने घडवून आणला नसल्याचे दिसते. हे काम दुसऱ्या कुणीतरी केले आहे. तिथे बरेच लोक होते, त्यांना स्फोट नेमका कशामुळे झाला हे माहीत नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले. गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर बायडेन गुरुवारी इस्रायलला आले.

जर्मनीत ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर हल्ला
nजर्मनीची राजधानी बर्लिन येथील ज्यूंचे प्रार्थनास्थळ असलेल्या सिनेगॉगवर बुधवारी अज्ञात व्यक्तींनी फायरबाॅम्बने हल्ला केला. इस्रायल व हमास यांच्यात पेटलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
nअज्ञात हल्लेखोरांनी सिनेगॉगवर फायरबाॅम्ब फेकल्याच्या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी किंवा प्राणहानी झाली नाही. ओलाफ स्कोल्झ यांनी सांगितले की, ज्यूंची प्रार्थनास्थळे, त्यांच्या संस्थांवर होणारे हल्ले अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. जर्मनीतील सेंट्रल कौन्सिल ऑफ ज्यूज या संघटनेने हल्ल्याने सर्वांना धक्का बसल्याचे म्हटले.

Web Title: The conflict will intensify; Middle East countries warning to Israel, America and its allies after gaza hospital attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.