बॉम्ब सायक्लोनचा कहर; अमेरिकेत लाखो घरांमधील बत्ती गुल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 07:16 AM2022-12-29T07:16:34+5:302022-12-29T07:17:26+5:30
अमेरिकेत बॉम्ब सायक्लोनचा कहर सुरूच असून, या हिमवादळामुळे मृतांचा आकडा जवळपास ६० झाला आहे.
न्यूयॉर्क: अमेरिकेत बॉम्ब सायक्लोनचा कहर सुरूच असून, या हिमवादळामुळे मृतांचा आकडा जवळपास ६० झाला आहे. न्यूयॉर्कमधील बफेलो शहरात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत येथे २८ जणांना जीव गमवावा लागला आहे.
बर्फात गाडलेल्या वाहनांमध्येही लोकांचे मृतदेह सापडत आहेत, त्यामुळे मृत्यूच्या आकड्यात वाढ होण्य़ाची भीती अधिकारी वर्तवत आहेत. बफेलोमध्ये घरांवर आणि रस्त्यांवर ४ ते ८ फूट बर्फ साचला आहे. बफेलोमधील अधिकारी वाहनचालकांना जिवंत किंवा मृत शोधण्यासाठी प्रत्येक कार तपासत आहेत. लाखो लोकांच्या घरी वीज आणि पाणी नाही. लुटमारीच्या घटनाही समोर येत आहेत.
बर्फाचा थर तुटल्याने ३ भारतीय ठार
नारायण मुद्दना, हरिता मुद्दना, गोकुळ मेडिसेती या तीन भारतीय वंशाच्या व्यक्ती अमेरिकेतील एरिझोना येथे वूड्स केन्यॉन तलावावरून फिरत होते. बर्फाचा थर तुटल्यामुळे ते तलावात घुसले आणि त्यांचा मृत्यू झाला.
हजारो उड्डाणे रद्द
हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली असून, लोक हैराण झाले आहेत. मंगळवारी ५,००० उड्डाणे रद्द करण्यात आली, तर बुधवारी नियोजित सुमारे ३,५०० उड्डाणे देखील अगोदरच रद्द करण्यात आली. कॅनडालाही या वादळाचा फटका बसला असून, तापमान उणे ४३ अंशावर जाण्याची शक्यता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"