युद्धामुळे आलेले संकट मान्य नाही; भारताची संयुक्त राष्ट्रात भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 05:29 IST2024-04-10T05:28:43+5:302024-04-10T05:29:11+5:30
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे, विशेषत: महिला आणि लहान मुलांचे नुकसान झाले आहे

युद्धामुळे आलेले संकट मान्य नाही; भारताची संयुक्त राष्ट्रात भूमिका
संयुक्त राष्ट्रे : ‘रमजान महिन्यासाठी गाझामध्ये तत्काळ युद्धविराम करण्याची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव सकारात्मक पाऊल आहे. सध्या सुरू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षामुळे उद्भवलेले मानवतावादी संकट अस्वीकारार्ह आहे,’ अशी भूमिका भारताने संयुक्त राष्ट्र आमसभेत ठामपणे मांडली.
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे, विशेषत: महिला आणि लहान मुलांचे नुकसान झाले आहे. भारताने या संघर्षात नागरिकांच्या मृत्यूचा तीव्र निषेध केला आहे आणि कोणत्याही संघर्षाच्या परिस्थितीत नागरिकांची जीवितहानी टाळणे अत्यावश्यक आहे. युद्धामुळे आम्ही खूप त्रस्त आहोत, असेही संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी म्हटले आहे.
आण्विक प्रकल्पांवर हल्ल्याची धमकी
इस्रायल आणि इराणमधील तणावही वाढत आहे. गेल्या आठवड्यात दमास्कसमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आणि इराणी अधिकाऱ्यांकडून बदला घेण्याच्या धमक्यांनंतर इराणमधील आण्विक प्रकल्पांवर हल्ला करण्याचा इशारा इस्रायलने दिला आहे. इराण आगामी काळात आपल्या वतीने हल्ले करण्यास या प्रदेशातील विविध यंत्रणांना उद्युक्त करील असे सांगण्यात येते.
शपथ घेणे महागात पडेल : अमेरिका
नेतन्याहू यांनी रफाह या शहरावर आक्रमण करण्याची शपथ घेतली आहे. दरम्यान, अमेरिकेने मात्र रफाहवरील आक्रमण ही घोडचूक ठरेल आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी ठोस योजना आखण्याचे आवाहन केले आहे.