अमेरिकेतील महागाईने गुंतवणूकदार मालामाल; भारताला झाला फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 07:43 AM2022-08-08T07:43:01+5:302022-08-08T07:43:07+5:30
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सप्ताहामध्ये ८१७.६८ अंशांनी वाढून ५८,३८७.२५ अंशांवर पोहोचला.
- प्रसाद गो. जोशी
कंपन्यांची अपेक्षेहून चांगली झालेली कामगिरी, देशातील औद्योगिक उत्पादनामध्ये झालेली वाढ, पतधोरणामध्ये महागाई कमी होण्यासाठी केलेले अपेक्षित उपाय तसेच परकीय वित्तसंस्थांनी कायम ठेवलेली खरेदी यांमुळे गेल्या आठवड्यात बाजार चांगला वाढला. सलग तिसऱ्या सप्ताहामध्ये निर्देशांकांची वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सप्ताहामध्ये ८१७.६८ अंशांनी वाढून ५८,३८७.२५ अंशांवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७,३९७.५० अंशांवर पोहोचला आहे. सप्ताहामध्ये त्यात २३९.२५ अंशांची वाढ झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही चांगली वाढ झालेली दिसून आली.
कुणी किती कमावले?
कंपनी एका आठवड्यातील वाढ
इन्फोसिस २८,१७०.०२ कोटी
टीसीएस २३,५८२ कोटी
रिलायन्स इंडस्ट्रीज १७,०४८.२१ कोटी
आयसीआयसीआय १३,८६१.३२ कोटी
एलआयसी ६,००८.७५ कोटी
बजाज फायनान्स ५,७०९.२ कोटी
एसबीआय २,१८६.५३ कोटी
या आठवड्यात काय?
- बुधवारी जाहीर होणारी अमेरिकेतील महागाईची आकडेवारी
- कंपन्यांचे तिमाही निकाल
- शुक्रवारी जाहीर होणारी औद्योगिक उत्पादन आणि चलनवाढीची आकडेवारी
- खनिज तेलाच्या किमती
- जगभरातील शेअर बाजार
एकाच आठवड्यात १४ हजार कोटी...
अमेरिकेत महागाई वाढत असल्याने डॉलर कमकुवत झाला. त्याचा फायदा भारताला झाला आहे. एकाच आठवड्यात परकीय गुंतवणूकादारांनी १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ॲाक्टोबर २०२१ ते जून २०२२ दरम्यान, त्यांनी भारतीय बाजारातून तब्बल २.४६ लाख कोटी रुपये काढून घेतले होते.