इम्रान खानच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट? निवडणूक आयोगाने केली मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 11:51 PM2023-08-08T23:51:58+5:302023-08-08T23:52:18+5:30
Imran Khan: पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान खान यांच्यावर निवडणूक लढवण्यास पाच वर्षांची बंदी घातली आहे. आयोगाने तोशाखाना प्रकरणामध्ये परदेशी नेत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न लपवल्याच्या आरोपाखाली इम्रान खानविरोधात ही कारवाई केली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजकीय कारकिर्दीचा जवळपास शेवट झाला आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान खान यांच्यावर निवडणूक लढवण्यास पाच वर्षांची बंदी घातली आहे. आयोगाने तोशाखाना प्रकरणामध्ये परदेशी नेत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न लपवल्याच्या आरोपाखाली इम्रान खानविरोधात ही कारवाई केली आहे.
या कारवाईमुळे पाकिस्तान तहरीक ए इंसाफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख असलेल्या इम्रान खान यांना पुढच्या पाच वर्षांपर्यंत निवडणूक लढवता येणार नाही. दरम्यान, या निर्णयाविरोधात इस्लामाबाद हायकोर्टामध्ये आव्हान देणार असल्याचे पीटीआय पक्षाचे सरचिटणीस असद उमर यांनी सांगितले.
पाकिस्तानी संकेतस्थळ ट्रिब्यूनच्या बातमीनुसार सत्तारुढ आघाडीतील खासदारांनी निवडणूक आयोगाकडे इम्रान खानविरोधात तक्रार केली होती. तसेच त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यावर सुनावणी केल्यानंतर गतवर्षी १९ सप्टेंबर रोजी कारवाई संपवून आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता.
त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुल्तान राजा यांच्या अध्यक्षतेखालील ईसीपीच्या चार सदस्यीय समितीने शुक्रवारी एकमताने आपला निर्णय जाहीर केला. इम्रान खान हे भ्रष्टाचारामध्ये सहभागी होते. तसेच त्यामुळे त्यांना संसदेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचार विरोधी कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, असे सुतोवाचही केले होते.
इम्रान खान यांना तोशाखानाशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये इस्लामाबाद स्थित जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. कोर्टाच्या या निर्णयानंतर इम्रान खान पाच वर्षांपर्यंत कुठल्याही सार्वजनिक पदावर बसू शकत नाहीत हे स्पष्ट झाले होते.