पाक महिला डॉक्टरांच्या नशिबी धुणीभांडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 09:01 AM2023-03-22T09:01:37+5:302023-03-22T09:02:04+5:30

नुकत्याच झालेल्या एका जागतिक सर्वेक्षणातही ही बाब समोर आली आहे.

The fate of Pakistani women doctors wash dishes! | पाक महिला डॉक्टरांच्या नशिबी धुणीभांडी!

पाक महिला डॉक्टरांच्या नशिबी धुणीभांडी!

googlenewsNext

तुम्हाला कोणतं शिक्षण घ्यायला आवडेल? तुम्हाला काय बनायला आवडेल? - डॉक्टर, इंजिनीअर, वकील, शिक्षक, उद्योजक, शेतकरी?... जगात कोणालाही हा प्रश्न विचारला तर बहुतेकांचं उत्तर असेल डॉक्टर! याच प्रोफेशनला इतकी जास्त मागणी असण्याची अनेक कारणं आहेत. त्यात मिळणाऱ्या पैशांपासून ते सामाजिक प्रतिष्ठेपर्यंत अनेक बाबी समाविष्ट आहेत. नुकत्याच झालेल्या एका जागतिक सर्वेक्षणातही ही बाब समोर आली आहे. अर्थात सगळेच डॉक्टर बनू शकणार नाहीत, ही गोष्टही तितकीच खरी, पण विद्यार्थ्यांना त्यांची अपेक्षा विचारली तर बहुतेकांचं हेच उत्तर येतं. याशिवाय आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगभरात बहुतांश देशांमध्ये डॉक्टरांची मागणी कायम वाढतीच आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात तिथे डॉक्टरांची संख्या कमीच आहे. भारत, पाकिस्तान, चीन यासारख्या देशांतही हीच वस्तुस्थिती आहे. 

यातला आणखी एक विरोधाभास म्हणजे पुरुष आणि महिला डॉक्टरांना असलेली सामाजिक पत. महिला डॉक्टरांकडे तुलनेनं कमीपणानं बघितलं जातं. पाकिस्तानमध्ये तर हे अधिकच खरं आहे. ही गोष्ट खरी आहे की जगभरातच आता महिला मोठ्या प्रमाणात शिक्षण घेताहेत. त्यामुळे महिला डॉक्टरांची संख्या वेगानं वाढते आहे, पाकिस्तानही त्याला अपवाद नाही, पण तिथल्या महिला डॉक्टरांची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्याचा परिणाम त्यांच्या अख्ख्या अर्थव्यवस्थेवर आणि समाजव्यवस्थेवर होतो आहे. 

पाकिस्तानात महिला डॉक्टरांचा स्ट्रगल खूपच अधिक आहे. महिला डॉक्टर म्हणून समाजाकडूनच त्यांना अपेक्षित मान, प्रतिष्ठा मिळत नाही. पाकिस्तानमधलाच एक अभ्यास सांगतो, पाकिस्तानातील पुरुष तेथील महिला डॉक्टरांकडे उपचारासाठी जाण्याचं टाळतात. त्यांना ते कमीपणाचं वाटतं. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना तर कॉलेज, अभ्यासाच्या काळापासूनच असमानतेला आणि लैंगिक शोषणाला बळी पडावं लागतं. विद्यार्थीदशेतच त्यांच्यावर होणाऱ्या लैंगिक भेदभावामुळे आणि त्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या त्रासाला कंटाळून अनेक विद्यार्थिनी मेडिकलचं शिक्षण सोडून देतात. परिस्थितीशी आणि समाजाशी झगडून ज्या तरुणी मेडिकलचं शिक्षण पूर्ण करतात, त्यांच्यामागचा ससेमिरा त्यानंतरही थांबत नाही. डॉक्टर म्हणून स्वत:ला प्रस्थापित करताना महिलांना खूप अडचणी येतात. प्रत्येक ठिकाणी त्यांची अडवणूक होते. पैशांचाही प्रश्न असतोच. त्यामुळे डॉक्टर बनण्यासाठी इतका वेळ, पैसा खर्च केल्यानंतर, इतकी मेहनत घेतल्यानंतरही दुजाभावालाच सामोरं जावं लागल्यानं या महिला डॉक्टर झाल्यानंतरही स्वत:हूनच या व्यवसायाकडे पाठ फिरवतात. 

डॉक्टर झालेल्या/होऊ पाहणाऱ्या या तरुणी मग काय करतात? पाकिस्तानातलाच एक अभ्यास सांगतो, मेडिकलचं शिक्षण घेत असतानाच काही तरुणी हे शिक्षण अर्धवट सोडतात, तर काही तरुणी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला डॉक्टरी करायला जमणार नाही, हे लक्षात आल्यानंतर कायमचं त्यापासून दूर होतात आणि दुसरं ‘प्रोफेशन’ निवडतात. त्यांनी निवडलेलं हे समाजमान्य प्रोफेशन म्हणजे ‘गृहिणी’ बनणं! इतकं शिकून काय करायचं आहे, शेवटी नवऱ्याचं घर, चूल-मूलच सांभाळायचं आहे ना, मग तेच कर.. असं म्हणून त्यांचं लग्न लावून दिलं जातं आणि या उच्चशिक्षित तरुणीही पुढे मग आयुष्यभर तेच करतात. घरची धुणी-भांडी करायची, पोरं सांभाळायची आणि सासू-सासरे, नवरा, आलेगेले पाहुणे यांच्यासाठी आयुष्यभर राबत राहायचं. त्यांच्या शिक्षणाचा ना त्यांना स्वत:ला फायदा होत, ना त्यांच्या कुटुंबाला, ना समाजाला.

पाकिस्तानातला हाच अभ्यास आणखी पुढे सांगतो, आमच्या देशात जवळपास ७० टक्के महिला डॉक्टरांना, मेडिकलच्या विद्यार्थिनींना भेदभावाला सामोरं जावं लागतं. यात महिला सर्जन्सचाही समावेश आहे. १०पैकी तब्बल ६ महिला डॉक्टरांना कामच मिळत नाही. स्वत:ची प्रॅक्टिस करणं आणि ती नावारूपाला आणणं दूरच, त्यांना हॉस्पिटलमध्ये काम द्यायलाही त्या त्या हॉस्पिटलचं प्रशासन नकार देतं. आपल्याकडे महिला डॉक्टर असल्या तर आपलं हॉस्पिटलच चालणार नाही आणि पेशंट आपल्याकडे येणार नाहीत अशी भीती त्यांना वाटते. ‘लेबर फोर्स’च्या अहवालानुसार पाकिस्तानात मेडिकल प्रोफेशनमध्ये पुरुषांची संख्या ६२ टक्के आहे, तर महिलाचा वाटा केवळ १८ टक्के, तोही दुय्यम दर्जाचा!

महिला डॉक्टरांना ‘घराबाहेर’ काढा!
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते पाकिस्तानात दहा हजार लोकसंख्येमागे केवळ दहा डॉक्टर आहेत. त्याच वेळी घरात केवल चूल-मूल आणि धुणीभांडी करीत असलेल्या या महिला डॉक्टर पुन्हा आरोग्य क्षेत्रात सक्रिय झाल्या तर पाकिस्तानातील आरोग्य व्यवस्था खूपच सुधारू शकेल. त्यासाठी त्यांना आधी घरातून बाहेर काढावं लागेल आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठाही द्यावी लागेल.

Web Title: The fate of Pakistani women doctors wash dishes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.