दुबईत साजरा झाला पहिला जिजाऊ जन्मोत्सव सोहळा; ढोल-ताशाच्या गजरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 20:07 IST2025-02-11T20:06:47+5:302025-02-11T20:07:55+5:30
या कार्यक्रमासाठी दुबई, अबुधाबी, शारजाह, अजमान, फुजेराह, रास अल खैमा येथून मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

दुबईत साजरा झाला पहिला जिजाऊ जन्मोत्सव सोहळा; ढोल-ताशाच्या गजरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
दुबई: जिजाऊ ब्रिगेड दुबई यांच्या विद्यमाने दुबईत पहिला जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आणि आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे दुसरे महाअधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. जिजाऊ जन्मोत्सवाची आणि महाअधिवेशनाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करुन आणि जिजाऊ वंदना गायनाने झाली. यानिमित्ताने दुबई येथे स्थापन झालेल्या पहिल्या महिलांच्या "स्वामिनी ढोल-ताशा पथकाचे" वादन झाले.
या कार्यक्रमासाठी दुबई येथून जाई कदम सुर्वे, वृषाली म्हात्रे आणि भारतातून आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा मयुराताई देशमुख, सत्यभामा पाटील, वंदना घोगरे, डॉ. शारदा जाधव, वनिता अरबट, सुजाता ठुबे, अनुजाराजे भोसले, वैशाली वायाळ आणि जिजाऊ ब्रिगेड दुबई अध्यक्षा सुनीता देशमुख उपस्थित होत्या. आंतरराष्ट्रीय अध्यक्षा मयूराताई देशमुख यांनी जिजाऊ ब्रिगेडचे आत्तापर्यंतचे कार्य, वाटचाल आणि यापुढे जिजाऊ ब्रिगेडची दिशा कशी असेल, याची माहिती सर्वांच्या समोर दिली.
सुनीता देशमुख यांनी जिजाऊंच्या शिकवणीचे तसेच त्यांचा गुणवत्तेचे दाखले देत आताचा जीवनात त्याचा महिलांना कसा उपयोग होईल, या बद्दल सांगितले. तसेच जिजाऊ ब्रिगेड दुबई ची वुमन एमपॉवर्मेंट साठीची पुढील वाटचाल सांगितली. याशिवाय, शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर लिखित "शून्यांचा ताळमेळ" या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच डॉ. संजय वायाळ यांच्याहस्ते जिजाऊ ब्रिगेडच्या पुस्तिकेचे अनावरणही करण्यात आले. कार्यक्रम स्थळी विविध प्रबोधनकारी सामाजिक संदेश देणारी भित्तीपत्रके लावण्यात आली होती. तसेच उपस्थित महिलांना पुस्तके भेट देण्यात आली.
या निमित्ताने आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडकडून दुबई येथे राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब यांचा इतिहासातील महत्व अधोरेखित करणारा पुतळा उभारणी करणे आणि राष्ट्रमाता जिजाऊ ग्रंथालयाची स्थापना, ज्यात समानता, करूणा, नेतृत्व आणि देशभक्ती यावरील आधारित साहित्य उपलब्ध असेल जे ज्ञान आणि प्रेरणेचे केंद्र बनेल, असे आंतरराष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रमाता जिजाऊ ग्रंथालय स्थापन करण्यात यावे आणि याचे निवेदन स्थानिक प्रशासनाला द्यावे, असे ठराव पारित करण्यात आले.
यानिमित्ताने वाणीता ताई अरबट, सुजाता ठुबे, डॉ. शारदा जाधव यांनी आपली मनोगते या ठिकाणी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा दुबई येथील व्यवसायिक जाई कदम सुर्वे यांनी सांगितले की एका महिलेला आपले घर सांभाळून व्यवसाय कसा करता येऊ शकतो आणि कित्येक अडचणी वरती मात करत एक स्त्री कशी प्रगती साधू शकते. तसेच दुबई येथील व्यावसायिका वृषाली म्हात्रे यांनी स्वतःचा प्रेरणादायी जीवन प्रवास या निमित्ताने सर्वांच्या समोर मांडला.