हवामान बदलाबाबत भारताच्या प्रयत्नांना ‘जी-७’ने सहकार्य करावे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:50 AM2022-06-28T11:50:13+5:302022-06-28T11:50:49+5:30
जी-७ गटाच्या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी जर्मनीमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सांगितले की, जीवाश्म नसलेल्या स्रोतांमधून ४० टक्के ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट भारताने मुदतीच्या नऊ वर्षे आधीच पूर्ण केले आहे.
एल्माऊ : हवामानात होणारे विपरीत बदल रोखण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करीत असून, त्याला जी-७ गटातील देश संपूर्ण सहकार्य करतील, अशी आशा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. भारतातील स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या मोठ्या बाजारपेठेतील संधींचा लाभ घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-७ गटातील श्रीमंत देशांना केले.
जी-७ गटाच्या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी जर्मनीमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सांगितले की, जीवाश्म नसलेल्या स्रोतांमधून ४० टक्के ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट भारताने मुदतीच्या नऊ वर्षे आधीच पूर्ण केले आहे. स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानासाठी भारताच्या प्रयत्नांना जी-७ देशांनी सहकार्य करावे, असे आवाहन मोदी यांनी केले.
बायडेनसह प्रमुख नेत्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदेऊ, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ, आदी मान्यवर नेत्यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यांच्याशी आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.