"डॉलरला दुर्लक्षित करण्याचा खेळ चालणार नाही, नाहीतर..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिक्स देशांना 'मेसेज'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 08:52 IST2025-01-31T08:50:36+5:302025-01-31T08:52:29+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स सदस्य राष्ट्रांना थेट धमकी दिली आहे. डॉलरऐवजी दुसरे चलन आणता येणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

"डॉलरला दुर्लक्षित करण्याचा खेळ चालणार नाही, नाहीतर..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिक्स देशांना 'मेसेज'
Donald Trump Dollar Brics: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना अप्रत्यक्षपणे धमकीच दिली आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारात डॉलर चलनाऐवजी दुसरे चलन ब्रिक्स देशांकडून आणले जाऊ शकते, असे रिपोर्ट समोर आले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांवर निशाणा साधला. भारत, चीनसह इतर देश ब्रिक्स संघटनेचे सदस्य आहेत.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट करत म्हटलं की, अमेरिकेचे म्हणणे आहे की, ब्रिक्स देशांनी हे समजून घ्यावं की, ते अमेरिकी डॉलरला बदलू शकत नाहीत. जर असे झाले तर ब्रिक्स सदस्य देशांवर १०० टक्के कर लावला जाईल.
डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट काय?
ट्रूथ सोशल या प्लॅटफॉर्मवर डोनाल्ड ट्रम्प यांनी ही पोस्ट केली आहे. "ब्रिक्स देश अमेरिकी डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचे प्रयत्न करत आहेत. आम्ही फक्त गोंधळून गेलो आहोत. पण आता हे चालणार नाही. आमचे म्हणणे आहे की, विरोधी देशांनी अमेरिकी डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी ब्रिक्सचे चलन आणू नये, तसेच कोणत्याही इतर चलनाना पाठिंबा देऊ नये. जर असे केले गेले नाही, तर ब्रिक्स देशांवर १०० टक्के कर लावण्यात येईल", अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना दिली.
ट्रम्प पुढे म्हणाले की, असे झाले नाही, तर या देशांसाठी अमेरिकेच्या बाजाराचे दरवाजे बंद होतील. त्यांना दुसरा बाजार शोधावा लागेल. याची कोणतीही शक्यता नाही की, ब्रिक्स देश आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या चलनाला पाठिंबा देतील.
ब्रिक्स देशांना आधीही दिला होता इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतरच ब्रिक्स देशांना इशारा दिला होता. ब्रिक्स देशांनी अमेरिकेविरोधात धोरणे आणली तर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. या देशांनी अमेरिकेच्या हिताच्या विरोधात अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. जर यापुढेही हे देश असेच करत राहिले तर त्यांच्यासोबत जे होईल, त्यानंतर ते आनंदी राहू शकणार नाहीत, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.