काळाचा महिमा...! ब्रिटिशांनी कधी काळी भारतीयांना फुकटे म्हटलेले; तिथेच आज एक भारतीय हॉटेल उघडतोय...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 03:55 PM2023-09-13T15:55:44+5:302023-09-13T15:56:03+5:30
भारताला स्वातंत्र्य देऊ नये याचे चर्चिल पक्के समर्थक होते. त्यांचे वॉर ऑफिस आता एक लक्झरी हॉटेल बनणार आहे.
भारत जेव्हा स्वातंत्र्याच्या वाटेवर होता, तेव्हाच म्हणजे १९४७ मध्ये तत्कालीन ब्रिटीश नेते आणि माजी पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली होती. भारतीयांना त्यांनी दुष्ट आणि फुकट खाणारे म्हटले होते. आता या ब्रिटिशांची घमेंड चांगलीच उतरलेली आहे. ७८ वर्षांनी याच ब्रिटनवर एक भारतीय वंशाची व्यक्ती राज्य करत आहे. तर आणखी एक भारतीय चर्चिल यांची अखेरची निशानी नष्ट करायला निघाला आहे.
भारताला स्वातंत्र्य देऊ नये याचे चर्चिल पक्के समर्थक होते. त्यांचे वॉर ऑफिस आता एक लक्झरी हॉटेल बनणार आहे. हिंदुजा ग्रुप या हॉटेलचा मालक बनला आहे. येत्या २६ सप्टेंबरला हे हॉटेल सुरु केले जाणार आहे. ही इमारत वॉर ऑफिस म्हणून ओळखली जात होती. १९०६ मध्ये बनलेल्या या इमारतीमध्ये दुसऱ्या महायुद्धावेळी चर्चिल इथूनच सारी सूत्रे हलवत होते. ही इमारत ब्रिटिश आर्किटेक्ट विलियम यंग यांनी डिझाईन केली होती.
नंतर हे वॉर ऑफिस जेम्स बाँडचे सिनेमे आणि द क्राऊनसारख्या नेटफ्लिक्स सिरीजमध्ये पाहिले गेले. युद्ध परिषदेच्या मान्यतेने वॉ़र ऑफिस सुरु केले गेले होते. या परिषदेत राजा आणि त्याचे वरिष्ठ सेनापती होते. या परिषदेवर ब्रिटिश साम्राज्यातील युद्धे आणि मोहिमांसाठीची जबाबदारी देण्यात आली होती.
चर्चिलचे वॉर ऑफिस हे लंडनमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. ही ऐतिहासिक वास्तू यूके सरकारने 1 मार्च 2016 रोजी 250 वर्षांच्या भाडेतत्त्वावर 350 दशलक्ष पौंडांपेक्षा जास्त किमतीत विकली होती. चर्चिल यांनी युद्धाच्या काळात 115 वेळा बैठका घेतल्या होत्या. 16 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने अण्वस्त्र हल्ला केला तेव्हा इथे 24 तास बैठका झाल्या होत्या. ही चर्चिल यांची अखेरची निशानी होती जी आता हिंदुजा ग्रुपकडे आहे आणि तिचा चेहरामोहरा बदलला आहे.