"भारतीय वंशाचा मोठा अभिमान", ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जिंकले कोट्यवधींचे मन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 07:28 PM2023-09-06T19:28:30+5:302023-09-06T19:36:42+5:30
मी भारतीय वंशाचा असल्याचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
नवी दिल्ली - ब्रिटनच्या पंतप्रधानपदी मूळ भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची निवड झाली आणि भारतीयांनीही जल्लोष साजरा केला. भारतीयांनाही अभिमान वाटवा असा तो क्षण होता, म्हणूनच भारतातही ऋषी सुनक यांच्या निवडीने भारतीय आनंदीत झाले होते. आता, यासंदर्भात स्वत: पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना या घटनेचा उल्लेख केला. मी पंतप्रधान झाल्यानंतर भारतीयांकडून मिळणाऱ्या शुभेच्छा ह्या माझ्यासाठी भारावून जाणारा अनुभव होता, असे सुनक यांनी म्हटले. तसेच, मी भारतीय वंशाचा असल्याचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
कथावाचक मोरारी बापू यांनी प्रतिष्ठित केंब्रिज विद्यापीठात रामकथा वाचनाचा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमास ऋषी सुनक यांनी भेट देत आपण हिंदू असल्याचा मला अभिमान असल्याचं म्हटलं होतं. आता, पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सुनक म्हणाले की, जेव्हा त्यांची पंतप्रधानपदी निवड झाली, तेव्हा भारतीयांकडून मिळालेल्या प्रतिसादाने ते भारावून गेले होते.
"माझी पत्नी भारतीय आहे आणि अभिमानी हिंदू असल्याने, माझा भारताशी आणि भारतातील लोकांशी नेहमीच संबंध राहील. मी मूळ भारतीय वंशाचा असल्याचाही मला मोठा अभिमान आहे, असेही सुनक यांनी म्हटले. तसेच, माझ्या पंतप्रधानपदी निवडील भारतीय लोकांचा मिळालेला प्रतिसाद जबरदस्त आणि विनम्र होता," असेही सुनक यांनी म्हटले.
ब्रिटन आणि भारत यांच्यातील संबंध हे दोन देशांचे भविष्य निश्चित करतील, ते वर्तमानापेक्षा अधिक मजबूत असतील, असे भाकीतही त्यांनी केले. दरम्यान, ऋषी सुनक या आठवड्याच्या शेवटी भारतात येणार आहेत