चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा कहर, स्मशानांमध्ये मोठी गर्दी; 24 तास जाळले जातायत मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 05:42 PM2023-12-25T17:42:49+5:302023-12-25T17:44:07+5:30
चीनमध्ये कोरोनाचा नवा सब-व्हेरिअंट जेएन.1 चा कहर बघायला मिळत आहे. याशिवाय भारतातही जेएन.1 चे वाढते रुग्ण चिंतेचा विषय बनले आहेत.
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर बघायला मिळत आहे. येथे कोरोना संक्रमण वेगने वाढताना दिसत आहे. परिणामी, होणाऱ्या मृत्यूंमुळे येथील स्मशानांत 24 तास मृतदेह जाळली जात आहेत. येथेही कोरोनाचा नवा सब-व्हेरिअंट जेएन.1 चा कहर बघायला मिळत आहे. याशिवाय भारतातही जेएन.1 चे वाढते रुग्ण चिंतेचा विषय बनले आहेत.
डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाच्या या व्हेरिअंटमुळे चीनमधील मृतांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. स्मशानांमध्ये पुन्हा एकदा गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. महत्वाचे म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेने सब-व्हेरिअंट जेएन.1 ला 'व्हेरिअंट ऑफ इंट्रेस्ट'च्या श्रेणीत ठेवले आहे. डब्लूएचओने म्हटले आहे की, गेल्याकाही दिवसांत जगातील काही देशांमध्ये जेएन.1 चे रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हायरस जगभरात वेगाने पसरत आहे.
स्मशानांमध्ये गर्दी वाढली -
डेली स्टारने, चीनमधील हेनान प्रांतातील स्थानिकांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, कोरोमुळे येथील स्थिती गंभीर होत चालली आहे. सरकारी स्मशानांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृतदेह आले आहेत की, त्यांच्यावर 24 तास अंत्यसंस्कार सुरू आहेत. अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत असलेले मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले आहेत. यामुळे अत्यसंस्कारासाठी लोकांना तासंतास वाट बघावी लागत आहे.
अशी आहे भारताची स्थिती -
माध्यमांतील वृत्तानुसार, देशात सध्या 1,18,977 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यांपैकी 7,557 गंभीर आहेत. भारतातील कोरोना स्थितीसंदर्भात बोलताना, नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोविड टास्कफोर्सचे सह-अध्यक्ष राजीव जयदेवन म्हणाले, “काही मृतांची नोंद झाली आहे. मात्र, बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नाही."