एका भूकंपाने सर्व उध्वस्त; घर तुटले, संसार मोडला, माणसंही गेली...!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 07:16 AM2023-02-14T07:16:17+5:302023-02-14T07:17:19+5:30
भूकंपाला आठवडा उलटल्याने जगण्याची शक्यता कमी, तरीही प्रयत्नांची शर्थ
अंकारा : तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपाला आठवडा उलटला असतानाही, बचाव कर्मचाऱ्यांची ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी प्रयत्नांची शर्थ सुरूच आहे. या भूकंपात ३३ हजारांहून अधिक लोक मारले गेले असून, अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याने ते वाचण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे अनेक जण मृतदेहांच्या ढिगाऱ्यात प्रियजनांचा शोध घेत आहेत.
एका व्हिडीओत बचाव कर्मचारी ढिगाऱ्यामध्ये बोगदा करून एकाला बाहेर काढत असल्याचे दिसते. ही व्यक्ती पाच दिवसांपासून ढिगाऱ्याखाली अडकलेली होती. अशाच प्रकारे अलीकडे दोनजणांचे प्राण वाचविण्यात आले होते. सात वर्षांचा मुस्तफा आणि नफीज इलमाज यांना रविवारी बाहेर काढण्यात आले.
मृतांची संख्या ५० हजारांवर जाण्याची भीती
तुर्की व सीरियातील बचाव कार्यासाठी जगभरातील देश मदत करत आहेत. तुर्कस्तानचे ३२ हजार कर्मचारी व आंतरराष्ट्रीय पथकांतील ८ हजार २९४ बचाव कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जिवंत लोकांचा शोध घेत आहेत. दरम्यान, संयुक्त राष्ट्राने भूकंपबळींची संख्या ५० हजारांवर जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे.
तुर्कीतील भूकंपात अनेक इमारती भुईसपाट झाल्या. या महिलेच्या कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आता प्रतीक्षा आहे मृतदेह बाहेर काढण्याची. मदत करणारे पथक या ठिकाणी दाखल झाले तेव्हा या महिलेने हंबरडा फोडत आपल्या अश्रुंना वाट करुन दिली.
तीन देशांची बचाव पथके परतली
सीरिया सीमेवरील बचावकार्य सोडून अनेक देशांची बचाव पथके मायदेशी परतत आहेत. रविवारी इस्रायलने सुरक्षेचे कारण सांगून आपले पथक हतझाला ग्रुपला आपत्कालीन विमानाने परत बोलावले. यापूर्वी जर्मनी आणि ऑस्ट्रियानेही तुर्कस्तानातून आपले बचाव कर्मचारी काढून घेतले होते.
तुर्कस्तानच्या सीमेवर वेगवेगळ्या गटांमध्ये हिंसक चकमकी होणार असल्याची माहिती इस्रायलसह अनेक देशांच्या गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे तेथे बचाव कार्यासाठी आलेल्या विविध देशांच्या कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. जर्मनीच्या बचाव पथकानेही तेथे गोळीबार सुरू असल्याची माहिती दिली.