अमेरिकेतील निवडणुकीच्या डिबेटमध्येही गाजला भारतीय वंशाचा मुद्दा; कमला हॅरिस यांच्याबद्दल काय म्हणाले ट्रम्प?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 02:26 PM2024-09-11T14:26:52+5:302024-09-11T14:30:04+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांनी या चर्चेवेळी कमला हॅरिस यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करण्यास सुरुवात केली.
American Presidential Debate ( Marathi News ) : अमेरिकेतील निवडणुकीला अवघे दोन महिने बाकी असून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात नुकतीच पहिली खुली चर्चा पार पडली. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आणि कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने अमेरिकेतील निवडणूक रंगतदार झाली असून याचे प्रतिबिंब पहिल्या प्रेसिडेंशियल डिबेटमध्येही पाहायला मिळालं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या चर्चेवेळी कमला हॅरिस यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करण्यास सुरुवात केली. अमेरिकन अर्थव्यवस्थेबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी कमला हॅरिस आणि त्यांचे वडील मार्क्सवादी असल्याचं म्हटलं. "कमला हॅरिस या तीन ते चार वर्षांपूर्वी ज्या गोष्टींना मानत होत्या त्या गोष्टी आता संपल्या आहेत. त्या मार्क्सवादी आहेत. त्यांचे वडीलही अर्थशास्त्राच्या बाबतीत मार्क्सवादी होते," असं ट्रम्प म्हणाले. बायडन सरकारच्या काळात देशात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला.
ट्रम्प यांच्या आरोपावर कमला हॅरिस यांनीही जोरदार पलटवार केला. "ज्या व्यक्तीवर आधीच गुन्हेगारीचे आरोप आहे त्या व्यक्तीने गुन्हेगारीवर भाष्य करणं योग्य वाटत नाही," असं हॅरिस यांनी म्हटलं.
दरम्यान, भारतीय आणि जमैका वंशाच्या असल्यावरूनही डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्यावर निशाणा साधला. "कमला हॅरिस या लोकांनुसार आपला रंग बदलतात. त्या कधी भारतीय वंशाची असल्याचं सांगतात तर कधी कृष्णवर्णीय असल्याचं सांगतात," असा हल्लाबोल ट्रम्प यांनी केला आहे.