जगातील सर्वात भ्रष्ट देशांची यादी झाली प्रसिद्ध, हे देश सर्वात भ्रष्ट, भारत या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:51 IST2025-02-12T09:50:02+5:302025-02-12T09:51:24+5:30
List Of World Most Corrupt Countries: ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने करप्शन परसेप्शन इंडेक्स २०२४ची क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या सीपीआयच्या अहवालानुसार २०२४ वर्षाच्या भ्रष्ट देशांच्या क्रमवारीत भारत १८० देशांमध्ये ९६ व्या क्रमांकावर आहे.

जगातील सर्वात भ्रष्ट देशांची यादी झाली प्रसिद्ध, हे देश सर्वात भ्रष्ट, भारत या क्रमांकावर
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने करप्शन परसेप्शन इंडेक्स २०२४ची क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. ही क्रमवारी प्रसिद्ध करण्यासाठी सीपीआय १८० देश आणि विभागांना सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या कथित स्तराच्या आधारावर रँकिंग देते. यामध्ये देशांना ० ते १०० यादरम्यान गुण दिले जातात. या क्रमवारीत अधिक गुण मिळवणाऱ्या देशांना भ्रष्टाचार मुक्त किंवा कमी भ्रष्ट तर शून्य गुण मिळवणाऱ्या देशांना सर्वात भ्रष्ट देशाचा दर्जा दिला जातो.
मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या सीपीआयच्या अहवालानुसार २०२४ वर्षाच्या भ्रष्ट देशांच्या क्रमवारीत भारत १८० देशांमध्ये ९६ व्या क्रमांकावर आहे. २०२३ च्या तुलनेत या क्रमवारीत भारताचा एक गुण घटला आहे. त्यामुळे भारताची क्रमवारी ३ क्रमांकानी घटली आहे. भारताला १०० पैकी ३८ गुण मिळाले आहेत. तर २०२३ मध्ये भारताला ३९ आणि २०२२ मध्ये ४० गुण मिळाले होते. २०२३ मध्ये भारत ९३ व्या क्रमांकावर होता.
भारताच्या शेजारील देशांचा विचार केल्यास पाकिस्तान (१३५), श्रीलंका (१२१) क्रमांकावर आहे. तर बांगलादेश १४९ व्या क्रमांकावर आहे. तर चीनने या क्रमवारीत ७६ वं स्थान पटकावलं आहे. भ्रष्टाचारमुक्त देशांच्या यादीत डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर आहे. तर फिनलंड दुसऱ्या आणि सिंगापूर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
जगातील बहुतांश देशांमध्ये भ्रष्टाचार ही गंभीर समस्या बनली असल्याचे सीपीआयने २०२४ च्या आपल्या अहवालात म्हटले आहे. मात्र काही देशांमध्ये सकारात्मक बदल होत आहे. तसेच २०१२ नंतर ३२ देशांनी आपल्या देशातील भ्रष्टाचाराची पातळी बऱ्यापैकी कमी केली आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.