अथांग सागरातील ३ महिन्यांचा एकाकी थरार!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 07:17 AM2023-07-24T07:17:39+5:302023-07-24T07:18:01+5:30
टिमोथी लिंडसी शॅडोक हा ५५ वर्षांचा दर्यावर्दी आणि त्याची बेला नावाची कुत्री यांनी मे महिन्याच्या सुरुवातीला मेक्सिकोच्या किनाऱ्यावरून मासेमारी मारण्यासाठी समुद्रात बोट लोटली.
टिमोथी लिंडसी शॅडोक हा ५५ वर्षांचा दर्यावर्दी आणि त्याची बेला नावाची कुत्री यांनी मे महिन्याच्या सुरुवातीला मेक्सिकोच्या किनाऱ्यावरून मासेमारी मारण्यासाठी समुद्रात बोट लोटली. त्यावेळी त्याचा प्लॅन होता, तो केवळ एकट्याने समुद्रात मासेमारी करण्याचा. पण, त्याचा एकट्याने जाण्याचा मूळ प्लॅनच बेलाने बदलला.
शॅडोक हा खरं म्हणजे ऑस्ट्रेलियन दर्यावर्दी माणूस. पण, त्याला मेक्सिकोमध्ये फिरताना बेला नावाची रस्त्यावरची भटकी कुत्री भेटली. त्याने तिच्यासाठी तीन वेळा घर शोधायचा प्रयत्न केला; पण, ती काही केल्या त्याला सोडून जाईना. ती सारखी त्याच्याच मागे जात राहिली. अखेर तिच्या हट्टापुढे मान तुकवून शॅडोकने तिला आपल्याबरोबर ठेवायचा निर्णय घेतला.
साहजिकच शॅडोक मासेमारी करण्यासाठीही बेलाला बरोबर घेऊन गेला. त्यावेळी त्याचा मूळ प्लॅन होता तो फ्रेंच पॉलिनेशिया नावाचं ठिकाण गाठण्याचा. त्यासाठी त्याला सी ऑफ कॉर्टिस किंवा गल्फ ऑफ कॅलिफोर्निया नावाचा समुद्र ओलांडून ६ हजार किलोमीटर्सचा प्रवास करायचा होता. त्यासाठी त्याने तयारीही केलेली होती. मात्र, त्याची ‘अलोहा तोआ’ नावाची छोटी कॅटॅमरान मध्येच वादळात सापडली आणि दुर्दैवाने बंद पडली.
मग सुरू झाला शॅडोक आणि बेलाचा जगातील सगळ्यात विस्तीर्ण प्रशांत महासागरातील प्रवास. या प्रवासातील सगळ्यात कठीण भाग होता तो म्हणजे हा प्रवास कधी आणि कसा संपेल हे शॅडोकला माहिती नव्हतं. कारण अथांग पसरलेल्या प्रशांत महासागरात भरकटलेलं हे तारू कोणाच्या नजरेस पडेल याची शक्यता मुळातच फार धूसर होती. आणि त्याहून मोठा प्रश्न असा होता, की त्यांच्या नशिबाने जेव्हा मदत मिळेल तोवर हे दोघं जिवंत कसे राहतील? पण, या परिस्थितीतील शॅडोकला अनुकूल असलेला भाग होता तो म्हणजे तो स्वतः मच्छीमार होता आणि मासेमारी करण्याच्या तयारीने निघालेला होता. त्यामुळे अन्नाचा प्रश्न त्याने मासे पकडून बऱ्यापैकी सोडवला. पण, पकडलेले मासे शिजवायला त्याच्याकडे काही नव्हतं. त्यामुळे त्याच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर त्याने बोटीवर अनेक दिवस माशांची सुशी खाऊन काढले. त्याच्या बेला नावाच्या कुत्रीला अर्थातच कच्चे मासे खाण्याची काही अडचण नव्हती. प्रशांत महासागरात त्याला जेव्हा केव्हा पाऊस लागला तेव्हा ते पावसाचं पाणी साठवून त्याने स्वतःची आणि कुत्रीची तहान भागवली. पण, शॅडोकला सगळ्यात जास्त वाचवलं ते त्याच्या मूळ स्वभावानं. तो स्वतःचं वर्णन करतो ते, शांत, एकटं राहायला आवडणारा आणि समुद्रावर एकट्यानं फिरायला आवडणारी व्यक्ती. एरवी एखादी व्यक्ती अनेक दिवस एकटं राहायला लागलं तर मनानं खचली असती; पण, शॅडोकची तब्येत बिघडली तरी तो मनाने खंबीर राहिला.
या टिकून राहण्याचं फळ शॅडोक आणि बेलाला मिळालं ते तब्बल ३ महिन्यांनंतर. त्यांची बंद पडलेली कॅटॅमरान मेक्सिको शहराच्या पश्चिमेला सुमारे ७९० किलोमीटर्स अंतरावर एका ट्यूना मासे पकडणाऱ्या मेक्सिकन ट्रॉलरला दिसली. अथांग समुद्रात एकट्याने तरंगत असलेली ही कॅटॅमरान बघून या ट्रॉलरवरच्या कॅप्टनने, ऑस्कर मेझा ओरेगॉन याने जवळ जाऊन शोध घेतला आणि त्यात त्यांना खंगलेला, दाढी वाढलेला, अतिशय बारीक झालेला शॅडोक आणि बेला आढळले. त्यांनी अर्थातच त्यांना आपल्या ट्रॉलरवर घेतलं. त्यांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदत दिली आणि त्या ट्रॉलरवरून शॅडोक सुखरूप जमिनीवर परत आला. त्यांना वाचवणाऱ्या ट्रॉलरचा मालक अँटोनियो सुआरेझ म्हणतो, “या माणसांच्या रस्त्यात आमचा ट्रॉलर पाठवल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. त्यांना वेळेवर मदत मिळाली नसती तर त्यांचा कदाचित मृत्यू झाला असता. एका साहसी माणसाच्या साहसी मोहिमेत त्याला मदत करण्यास आम्ही निमित्तमात्र ठरलो याचा आम्हाला आनंद आहे.”
इतक्या विलक्षण पद्धतीने भर समुद्रात कुठल्याही माणसाला न भेटता तीन महिन्यांइतक्या प्रदीर्घ काळ टिकून राहिलेल्या शॅडोकने सुखरूप जमिनीवर परत आल्यावर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्याही वेळी तो बऱ्यापैकी बारीक आणि दाढी वाढलेला अशाच अवस्थेत होता.
मी पुन्हा समुद्रात जाणार!
एकट्याने समुद्री मोहीम हाती घेण्याचा प्राणघातक अनुभव येऊनसुद्धा शॅडोक अजूनही म्हणतो, “मी कायमच समुद्रात जात राहीन. अर्थात, मी किती खोल समुद्रात जाईन ते काही आत्ता सांगता येत नाही. पण, मी समुद्रात जाणं सोडणार नाही हे नक्की. मला वाटतं, मला मुळातच निसर्ग फार जास्त आवडतो. मला वाचविणाऱ्या ट्रॉलर आणि त्याच्या कंपनीचा मी फार फार आभारी आहे. त्यांनी आमचा जीव वाचवला नसता तर आम्ही जगलो असतो की नाही हे सांगता येत नाही.”