माऊस विकला गेला दीड कोटी रुपयांत; स्टीव्ह जॉब्स यांना दिली होती प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 11:20 AM2023-03-23T11:20:39+5:302023-03-23T11:20:59+5:30
या माऊसची लिलावातील मूळ किंमत १२ लाख रुपये ठरविण्यात आली होती; पण त्यापेक्षा कित्येक पट अधिक रक्कम विक्रीच्या वेळी मिळाली.
वेलिंग्टन : कॉम्प्युटर, आयफोन यांचा साऱ्या जगात दबदबा निर्माण करणारे ॲपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांना प्रेरणा देणारा कॉम्प्युटरचा माऊस एका लिलावात १.४८ कोटी रुपयांना विकला गेला. या माऊसची लिलावातील मूळ किंमत १२ लाख रुपये ठरविण्यात आली होती; पण त्यापेक्षा कित्येक पट अधिक रक्कम विक्रीच्या वेळी मिळाली.
कॉम्प्युटर निर्मितीच्या प्रारंभीच्या दोन दशकांत या उपकरणाबाबत संशोधन होऊन अनेक छोटे-मोठे बदल करण्यात येत होते. याच कालावधीत कॉम्प्युटरचे पहिल्या पिढीतील माऊस व कोडिंग किसेट या गोष्टी डग्लस एंगलबार्ट यांनी बनविल्या होत्या. १९६८ साली या घटना घडल्या होत्या.
३३ हजार पौंडांना खरेदी केले माऊसचे पेटंट
ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स हे १९७८ साली आपले उपकरण अधिक उत्तम बनविण्यासाठी संशोधन करत होते. त्याचवेळी त्यांना एंगलबार्ट यांनी बनविलेल्या माऊसबद्दल माहिती मिळाली. स्टीव्ह जॉब्स यांनी एंगलबार्ट यांच्याकडून त्या माऊसचे पेटंट ३३ हजार पौंडांना खरेदी केले होते. कॉम्प्युटर चालविण्याची प्रणाली अधिक सुलभ होण्यासाठी स्टीव्ह जॉब्स यांनी या माऊसचा वापर केला.
२.७८ कोटींना विकला कॉम्प्युटर
स्टीव्ह जॉब्स यांनी संशोधनासाठी वापरलेली साधने, त्यांनी तयार केलेला ॲपल कंपनीचा पहिला संगणक कालांतराने एका लिलावामध्ये २.९७ कोटी रुपयांना विकला गेला होता.
ॲपल-१ नावाचा हा कॉम्प्युटर स्टीव्ह यांनी आपल्या एका सहकाऱ्याच्या मदतीने डिझाईन केला होता. त्यांनी बनविलेला पहिला आयफोन लिलावात ४५ लाख रुपयांना विकला गेला. स्टीव्ह जॉब्स यांनी वापरलेल्या आणखी काही वस्तूंनाही अशीच मोठी रक्कम मिळाली होती.
एंगलबार्ट यांनी तयार केलेल्या माऊसमुळे स्टीव्ह जॉब्स यांना प्रेरणा मिळाली होती. या माऊसला तीन बटणे व एक्स ॲक्सिस व वाय-ॲक्सिसवर धातूच्या दोन डिस्कचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे कर्सरच्या स्थितीची नेमकी माहिती मिळत असे.
या माऊसच्या नंतरच्या पिढीतल्या माऊसमध्ये नंतर खूप सुधारणा झाल्या. नव्या माऊसमध्ये एका बॉलचा वापर करण्यात आला. आता तर माऊसमध्ये लाईटचा वापर करून कर्सरच्या हालचाली केल्या जातात.