मालदीवच्या नवनियुक्त राष्ट्रपतींचा भारताला धक्का, निवडणूक जिंकताच केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 11:22 AM2023-10-04T11:22:00+5:302023-10-04T11:22:29+5:30
maldives: चीन समर्थक अशी ओळख असलेल्या मोइज्जू यांनी देशातील परकीय सैन्याची उपस्थिती संपुष्टात आणण्याच्या त्यांच्या संपर्काचा पुनरुच्चार केला आहे.
मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी निवडणुकीतील त्यांच्या विजयानंतर मालदीवला एक छोटा पण रणनीतिकदृष्ट्या मजबूत देश म्हणून समोर आणण्याचे धोरण आखले आहे. चीन समर्थक अशी ओळख असलेल्या मोइज्जू यांनी देशातील परकीय सैन्याची उपस्थिती संपुष्टात आणण्याच्या त्यांच्या संपर्काचा पुनरुच्चार केला आहे. शनिवारी झालेल्या निवडणुकीतील विजयानंतर आपल्या पहिल्या सार्वजनिक रॅलीला संबोधित करताना ४५ वर्षांच्या मुइज्जू यांनी भारताचं नाव घेतलं नाही. मात्र मालदीवमध्ये सैन्याची तैनाती असलेल्या भारताकडे तसा अंगुलीनिर्देश केला.
मुइज्जू यांनी सोमवारी रात्री एका सभेमध्ये सांगितले की, आम्ही मालदीवमध्ये उपस्थित असलेल्या सैन्य दलांना कायद्यानुसार परत पाठवणार आहोत. तसेच निश्चितपणे आम्ही त्यानुसार असं करणार आहोत. मालदीवचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मोइज्जू म्हणाले की, ज्या लोकांनी सैनिक आणले, ते त्यांना परत पाठवू इच्छित नाहीत. मात्र मालदीवच्या लोकांनी निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मावळते राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी पारंपरिक संरक्षक भारतासोबत मालदीवचे घनिष्ठ संबंध पुनर्स्थापित केले होते. तर त्यांच्या आधीचे राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी पायाभूत सुविधांच्या योजनांसाठी चीनकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन मालदीवला बीजिंगच्या जवळ नेले होते. मोइज्जू यांना यामीन यांचे प्रतिनिधी मानले जाते. यामीन यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षा झाल्याने निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.
दरम्यान, आपल्या विजयानंतर काही तासांच्या आतच मोइज्जू यांनी यामीन यांच्या मुक्ततेचा मार्ग मोकळा केला आहे. यामीन हे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये माफुशी तुरुंगात ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. त्यांना माले येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मुइज्जू हे सध्या मालेचे महापौर आहेत. त्यांना चीन समर्थक नेते म्हटले जाते. मात्र स्वत:चा चीन समर्थक असा उल्लेख करणाऱ्या वृत्तांना त्यांनी फेटाळून लावले आहे. तसेच आपण मालदीव समर्थक आहोत. असे सांगितले.