पाकिस्तानी भिकाऱ्यांची संख्या वाढली; सौदीला जाणाऱ्या विमानातून 16 भिकाऱ्यांना खाली उतरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 01:21 PM2023-10-01T13:21:09+5:302023-10-01T13:21:09+5:30
देशातील परिस्थिती बिघडत असल्यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिक परदेशात भीक मागण्यासाठी जात आहेत.
Pakistan Begger: भारताच्या शेजारील पाकिस्तानची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. पाकिस्तानची गरिबी आणि तिथल्या लोकांची दुर्दशा कोणापासूनच लपलेली नाही. तिथल्या लोकांना दोन वेळच्या जेवणाची सोय करणेही कठीण झाले आहे. त्यामुळेच पाकिस्तान आता भिकाऱ्यांचा निर्यातदार देश बनला आहे. ताजे प्रकरण पाकिस्तानच्या मुलतान विमानतळाचे आहे. विमानाने सौदी अरेबियाला जाणाऱ्या 16 भिकाऱ्यांना खाली उतरवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) ने दोन दिवसांपूर्वी मुलतान विमानतळावर सौदी अरेबियाला जाणार्या फ्लाइटमधून उमरा यात्रेकरूंच्या वेशातील 16 कथित भिकाऱ्यांना खाली उतरवले. पाकिस्तानी वृत्तवाहिनी डॉनने एफआयएच्या हवाल्याने सांगितले की, विमानातून उतरवलेल्या लोकांच्या गटात एक लहान मूल, 11 महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.
उमराहच्या नावावर व्हिसा घेतला
या लोकांनी उमराह व्हिसाद्वारे सौदी अरेबियाला जाण्यची योजना आखली होती. इमिग्रेशन प्रक्रियेदरम्यान, एफआयएच्या अधिकाऱ्यांनी या प्रवाशांची चौकशी केली, यावेळी त्यांनी आपण भीक मागण्यासाठी परदेशात जात असल्याची कबुली दिली. भीक मागून मिळणाऱ्या कमाईचा अर्धा भाग त्यांची व्यवस्था करणाऱ्या एजंटांना द्यावा लागतो, असेही त्यांनी उघड केले. एफआयएने या प्रवाशांना पुढील चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी मुलतान येथून अटक केली आहे.
पाकिस्तानी भिकारी परदेशात कसे जातात?
परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव झुल्फिकार हैदर यांनी मीडियाला सांगितल्यानुसार, सुमारे 30 लाख पाकिस्तानी सौदी अरेबियामध्ये, 15 लाख यूएईमध्ये आणि 2 लाख कतारमध्ये आहेत. बहुतांश भिकारी सौदी अरेबिया, इराण आणि इराकमध्ये जाण्यासाठी हज यात्रेसाठी जारी केलेल्या व्हिसाचा फायदा घेतात. तिथे पोहोचल्यावर ते भीक मागू लागतात. मक्का मशिदीशिवाय अनेक धार्मिक स्थळांवरुन मोठ्या प्रमाणात लोकांना पकडण्यात आले आहे, त्यापैकी बहुतांश पाकिस्तानी नागरिक आहेत.