१६,००० फूट उंचीवर विमान पोहोचले अन् दरवाजाच तुटला; सर्व १७४ प्रवासी सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 12:22 PM2024-01-07T12:22:44+5:302024-01-07T12:23:01+5:30
अलास्का एअरलाइन्सने रोखली बोइंगची उड्डाणे
पोर्टलँड (अमेरिका) : अलास्का एअरलाइन्सच्या एका बोइंग ७३७-९ मालिकेतील विमानाचा दरवाजा आणि मुख्य बॉडीचा काही भाग उड्डाण सुरू असताना अचानक तुटल्यामुळे कंपनीने आपल्या ताफ्यातील या जातीच्या सर्व विमानांचे उड्डाण तत्काळ रोखले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा एअरलाइन्सने हा निर्णय घेतला. विमानात १७४ प्रवासी आणि चालक दलाचे सहा सदस्य होते.
डीजीसीएचे विमान कंपन्यांना निर्देश
अलास्का एअरलाइनच्या विमानातील या घटनेनंतर हवाई वाहतूक नियामक नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) शनिवारी देशांतर्गत विमान कंपन्यांना त्यांच्या ताफ्यातील सर्व बोईंग ७३७-८ मॅक्स विमानांतील आपत्कालीन एक्झिटची (बाहेर पडण्याची सुविधा) त्वरित तपासणी करण्याचे निर्देश दिले.
अलास्का एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेन मिनीकुची यांनी सांगितले की, बोइंग ७३७-९ मालिकेतील सर्व ६५ विमानांचे उड्डाण आम्ही थांबविले आहे. यातील प्रत्येक विमानाची संपूर्ण तपासणी आणि देखभाल केली जाईल, त्यानंतरच त्यांना पुन्हा उड्डाणासाठी सज्ज केले जाईल. हे काम काही दिवसांत पूर्ण होईल.