उत्तरापेक्षा प्रश्न भयंकर युद्ध थांबवायचे की...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2024 12:37 PM2024-10-06T12:37:00+5:302024-10-06T12:37:22+5:30
या आव्हानाला जागतिक समुदाय कसे सामोरे जाणार, हा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे.
मुद्द्याची गोष्ट, रोहन चौधरी, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक:सध्या जगात विविध युद्धांनी चिंतेचे ढग निर्माण केले आहेत. रशिया-युक्रेन युद्ध असो, इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध असो की मग चिघळत असणारा मध्य-आशिया असो... या संघर्षांमुळे जागतिक राजकारणात निर्माण झालेली युद्धाची समस्या ही भविष्यकाळात गंभीर परिणाम निर्माण करणारी आहे. या आव्हानाला जागतिक समुदाय कसे सामोरे जाणार, हा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे.रशिया-युक्रेन युद्ध असो अथवा इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध किंवा चिघळत असणारा मध्य आशिया यामुळे जागतिक राजकारणात निर्माण झालेली युद्धाची समस्या ही भविष्यकाळात गंभीर परिणाम निर्माण करणारी आहे. युद्धामुळे समस्येचे समूळ उच्चाटन होते, अशी लोकप्रिय आणि प्रभावशाली भावना या समस्यामागे आहे; परंतु युद्धाच्या इतिहासावर नजर टाकल्यास समस्येचे निराकरण न होता उलटपक्षी ती अधिक जटिल बनल्याची उदाहरणे आहेत.
युद्धाचे कारण हे भूतकाळात असले तरीही त्याचे परिणाम वर्तमानकाळात आणि भविष्यकाळात भोगावे लागतात. सध्या सुरू असलेल्या युद्धातून देखील हे वास्तव अधिक अधोरेखित होते. या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या युद्धमय परिस्थितीने जागतिक समुदयासामोर दोन मोठे आव्हान निर्माण केले आहेत. या आव्हानाला जागतिक समुदाय कसे सामोरे जाईल यावर या युद्धाची दाहकता अवलंबून असेल.
पहिले आव्हान हे राजकीय आहे. जगातील कोणत्याही देशांकडे, आंतरराष्ट्रीय संघटनेकडे किंवा प्रादेशिक संघटनेकडे हे युद्ध थांबविण्याचे सामर्थ्य नाही आहे हे कटू वास्तव समोर आले आहे.
प्रामुख्याने पाश्चिमात्य देशात जागतिकीकरणाविरोधी सुरू असलेली लाट आणि कोरोनासारख्या जागतिक महामारी यामुळे बहुसंख्य देशांनी आपल्या देशांतर्गत राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी, युद्ध संपविण्यासाठी बाहेरून जो दबाव निर्माण करावा लागतो तो निर्माण करण्यात जागतिक समुदाय अपयशी ठरत आहेत. तसेच सध्याची परिस्थिती ही अमेरिका, चीन आणि युरोपातील देशांना फायदेशीर ठरत असल्यामुळे ते मध्यस्थी करू इच्छित नाहीत. संयुक्त राष्ट्रासारखी संघटना अजूनही बड्या देशांची गुलाम असल्यामुळे तिच्याकडून अपॆक्षा करणेही व्यर्थ आहे.
प्रादेशिक संघटना या आर्थिक गोष्टीपुरत्या मर्यादित असल्यामुळे त्या राजकीय परिस्थितीवर तोडगा काढण्यास असमर्थ आहेत. परिणामी, युद्धानेच राजकीय तोडगा काढणाऱ्यांसाठी हा काळ सुगीचा आहे. त्याचाच परिणाम म्हणजे ही युद्धे आहेत.
जागतिक समुदायापुढे सध्या कोणकोणती आहेत आव्हाने?
पहिल्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेशनची स्थापना झाली, तर दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्राची; परंतु या दोन्हीही संघटना जागितक राजकारणातील संघर्ष कमी करण्यास असमर्थ ठरली. जागतिक समुदायाला या चुकांतून धडा घेऊन जागतिक संघटनांची पुनर्रचना करण्याची गरज आहे; परंतु मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, तीही वेळेत? जोपर्यंत या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही तोपर्यंत युद्ध हेच जागतिक राजकारणाचे वास्तव राहणार.
जागतिक समुदायापुढे दुसरे आव्हान हे तंत्रज्ञानाचे आहे. रशिया-युक्रेन, इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध किंवा लेबनॉनमधील युद्धामध्ये वापरलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे युद्धपद्धतीत झालेला आमूलाग्र बदल हा युद्धाच्या दाहकतेची प्रचिती देत आहे.
पेजरसारख्या व्यक्तिगत उपकरणाचा किंवा इलॉन मस्कनिर्मित उपग्रहाचा जर युद्धात इतका परिणामकारक वापर होत असेल तर तंत्रज्ञान युद्धाला कोठे घेऊन जात आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. राजकीय तोडग्यांसाठी आंतरराष्ट्रीय संघटना किंवा प्रादेशिक संघटना निदान कागदावर तरी अवलंबून आहेत.
युद्धांचे संभाव्य परिणाम काय?
तंत्रज्ञानावर निर्बंध आणण्यासाठी अशी कोणतीही परिणामकारक संस्थात्मक रचनाच अस्तित्वात नाही. तंत्रज्ञानाचे विकेंद्रीकरण असणे गरजेचे आहे हे मान्य असले तरीही युक्रेन, लेबनॉन, इस्रायल, हमास यांच्याकडे असणारे विध्वंसक तंत्रज्ञान पाहता
युद्ध हे राष्ट्राच्याच नव्हे, तर मानवी अस्तित्वासमोर देखील गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहेत.
या युद्धातील निकाल कोणाच्या बाजूने जरी लागला तरीही यात वापरलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अशा प्रकारचे तंत्रज्ञान मिळविण्यासाठी सर्वच राष्ट्रे आपले सर्वस्व पणाला लावतील. राजकीय उदासीनता आणि तंत्रज्ञानातील आधुनिकता यामुळे निर्माण होणाऱ्या या शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे युद्धांची वारंवारता वाढणार असून युद्ध सुरू करणे आणि थांबविणे हे कोणाच्याच हातात राहणार नाही.
सध्या सुरू असलेल्या युद्धाने या प्रश्नाची जाणीव आपल्याला करून दिली असली तरी त्याचे उत्तर सोपे नाही. परिणामी, युद्धापेक्षा या वास्तवाची दाहकता जास्त गंभीर आहे.