'...तर संबंध बिघडू शकतात'; अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे तालिबान खवळला...!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 06:26 PM2022-08-02T18:26:55+5:302022-08-02T18:27:04+5:30
तालिबानने एक निवेदन जारी करत या घटनेचा निषेध केला आहे.
नवी दिल्ली- अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी (Ayman al-Zawahiri) याला ठार केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. जवाहिरी हा अमेरिकेच्या ‘मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट’पैकी एक होता. तोच दहशतवादी कारवायांना पुढे नेत होता. हा दहशतवादी नेता आता राहिला नाही, असे जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसच्या सायंकाळच्या भाषणात जाहीर केले.
आता न्याय मिळाला असल्याची भावना देखील जो बायडन यांनी व्यक्त केली. कितीही उशीर लागला, तुम्ही कुठेही लपलात तरी, आमच्या लोकांसाठी धोका असाल तर अमेरिका तुम्हाला शोधून बाहेर काढणार, असा इशारा यानिमित्ताने बायडन यांनी दिला आहे. या हल्ल्यादरम्यान इतर कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती बायडन यांनी दिली आहे. मात्र अमेरिकेच्या या कारवाईनंतर अफगाणिस्तानमधील सत्ताधारी तालिबान सरकारने निषेध केला आहे.
तालिबानने एक निवेदन जारी करत या घटनेचा निषेध केला आहे. इस्लामिक अमिराती (अफगाणिस्तान) या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करते. हा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय तत्त्वांचं आणि दोहा कराराचं स्पष्ट उल्लंघन आहे. अफगाणिस्तानच्या भूमीवर अमेरिकेनं केलेली कारवाई, ही दोन्ही देशांच्या हिताविरोधी आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणं दोन्ही देशातील संबंध बिघडवू शकतात, असंही तालिबानने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
Statement of the spokesperson of the Islamic Emirate regarding the drone attack in Kabul cityhttps://t.co/WWQC4iMo4apic.twitter.com/hobpGFMiRl
— Zabihullah (..ذبـــــیح الله م ) (@Zabehulah_M33) August 2, 2022
दरम्यान, अल- जवाहिरीच्या मृत्यूनंतर भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अल-कायदाशी संबंधित संघटनांकडून हल्ला होऊ शकतो. त्यामुळे अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर गुप्तचर खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. साधारणपणे जेव्हा-जेव्हा अल-कायदाचा नवीन उत्तराधिकारी आपली जागा सांभळतो. त्यानंतर अल-कायदाने विविध ठिकाणी हल्ले घडवून आणल्याचे याआधी दिसून आले.
२०११ साली ओसामा बिन लादेन याची हत्या करण्यात आली. त्यानंतरही दूतवासावर हल्ला करणं, विविध शहरांवर हल्ला करण्याचे प्रयत्न अल-कायदाकडून करण्यात आले. अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतरही अशाच प्रकारचे हल्ले होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच अल-कायदा लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या सारख्या दहशतवादी संघटनेला मदत करत असते. त्यामुळे या संघटनेचे जे स्लिपरसेल्स आहेत, त्यांना सक्रिय करण्याचे आदेश अल-कायदा देऊ शकतं, अशी माहिती समोर येत आहे.