हमास युद्धाची व्याप्ती वाढण्याचा धोका! इस्रायलचा आणखी एका देशावर हल्ला; 12 मुलांचा मृत्यू बनले कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 08:49 AM2024-07-31T08:49:34+5:302024-07-31T08:50:25+5:30
Israel attack on Lebanon: लेबनानध्ये सक्रीय असलेल्या हिजबुल्लाह आणि इस्रायलमध्ये गोलान हाईट्सवरून तणाव होता. मजदल शम्समध्ये हिजबुल्लाने केलेल्या हल्ल्यात १२ मुलांचा मृत्यू झाला होता.
एकीकडे रशिया युक्रेन युद्ध या दोन देशांमध्येच सुरु असताना तिकडे इस्रायलने भयावह पाऊल टाकले आहे. हमास या दहशतवादी संघटनेच्या बिमोडासाठी सुरु केलेले गाझा पट्टीतील युद्ध आता पुढे सरकू लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. इस्रायलने लेबनानच्या राजधानी बेरूतवर हल्ला केला आहे.
लेबनानध्ये सक्रीय असलेल्या हिजबुल्लाह आणि इस्रायलमध्ये गोलान हाईट्सवरून तणाव होता. मजदल शम्समध्ये हिजबुल्लाने केलेल्या हल्ल्यात १२ मुलांचा मृत्यू झाला होता. यामुळे चिडलेल्या इस्रायलने थेट लेबनानच्या बेरूतवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. यामध्ये हिजबुल्लाहचा टॉप कमांडर मारला गेला आहे.
इस्रायलच्या दाव्यानुसार गोलान हाईट्सवर झालेल्या हल्ल्यात या कमांडरचा हात होता. तर हिजबुल्लाहने हा हल्ला आपण केल्याचा आरोप फेटाळला होता. हा तनाव युद्धात परिवर्तित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायलला संयम ठेवण्यासाठी अनेक देशांनी विनंती केली होती. तरीही इस्रायलने लेबनानच्या राजधानीवरच हल्ला चढविल्याने खळबळ उडाली आहे.
1967 मध्ये सहा दिवसांच्या युद्धात इस्रायलने गोलान हाइट्सवर कब्जा केला होता. परंतू संयुक्त राष्ट्रे या भागाला सीरियाचा भाग मानते. इस्त्रायली सैन्याने गोलान हाईट्स ताब्यात घेतल्यानंतर तिथे इस्रायली वसाहत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 25,000 हून अधिक ज्यू इस्रायली राहत आहेत. मजदल शम्स इस्त्रायली-व्याप्त प्रदेशाच्या ईशान्य भागात आहे. या भागाची डोंगराळ जमीन सुपीक आहे, आणि ज्वालामुखीच्या मातीत सफरचंद आणि चेरीच्या बागा तसेच द्राक्षमळे मोठ्या प्रमाणावर आहेत. या प्रदेशात जॉर्डन नदी आणि हसबनी नदीसह महत्त्वाचे जलस्रोत आहेत. यामुळे हा भाग महत्वाचा ठरतो.