पुतिन यांच्या पोर्टेबल टाॅयलेटचं रहस्य! ‘सिक्रेट’ नेमकं आहे तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 06:40 AM2022-06-16T06:40:12+5:302022-06-16T06:40:27+5:30
का करतात पुतिन असं? गेल्या अनेक वर्षांपासून पुतिन यांच्या आरोग्याविषयी, त्यांच्या प्रकृतीविषयी अनेक विवाद आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी कोणकोणत्या गोष्टी जगापासून लपवून ठेवाव्यात? त्यांचं खासगी जीवन, त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया, त्यांना झालेली मुलं, ते कुठे जातात, काय करतात, त्यांचं आरोग्य इथपासून ते अगदी स्वत:चं मलमूत्रही ते लपवून ठेवतात! काही पत्रकारांनी ही शोधपत्रकारिता केली आहे. पुतिन जेव्हा जेव्हा अंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जातात, त्या प्रत्येकवेळी ते स्वत:चं पोर्टेबल टॉयलेट सोबत नेतात. त्यांच्यासोबतचे बॉडीगार्ड त्यांचं हे मलमूत्र एका विशेष पॅकेटमध्ये एकत्र करतात, जेणेकरून त्याची कुठलीही दुर्गंधी येऊ नये. हे पॅकेट नंतर खास त्यासाठीच बनवलेल्या एका सुटकेसमध्ये ठेवलं जातं. पुतिन परदेश दौऱ्यावरून पुन्हा मायदेशी परतले की मग या मलमूत्राची विल्हेवाट लावली जाते!
का करतात पुतिन असं? गेल्या अनेक वर्षांपासून पुतिन यांच्या आरोग्याविषयी, त्यांच्या प्रकृतीविषयी अनेक विवाद आहेत. काहींच्या मते पुतिन यांना कॅन्सर झालेला आहे. काहींच्या मते पुतिन मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. काही रिपोर्ट्सनुसार पुतिन यांना डिमेन्शिया झाला आहे, तर काही रिपोर्ट सांगतात, पुतिन हे त्यांना नेमका कोणता आजार आहे, हे मात्र आजपर्यंत खात्रीनं कोणालाही कळू शकलेलं नाही. परदेश दौऱ्यावर गेल्यानंतर पुतिन आपल्यासोबत खास पोर्टेबल टॉयलेट नेतात याचं कारणही तेच आहे. ज्या देशात आपण जात आहोत, तिथल्या लोकांनी, तिथल्या सरकारनं या मलमूत्राचं पृथक्करण करून आपल्याला कोणता आजार झाला आहे, हे शोधून काढलं तर?.. - पुतिन यांना तीच भीती वाटते आहे. त्यामुळे आपला आजार जगापासून लपवून ठेवण्यासाठी गेली अनेक वर्षे ते खबरदारी घेत आहेत आणि आपला आजार शोधून काढण्याची कोणतीही संधी आजवर त्यांनी कधीच कोणाला दिलेली नाही.
‘एएफपी’ या विदेशी वृत्तसंस्थेच्या एका ताज्या रिपोर्टनुसार पुतिन यांच्यासोबत जे बॉडीगार्ड असतात, त्यांची खास या कामासाठीच नियुक्ती केलेली असते. पुतिन यांच्या तब्येतीची काळजी घ्यायची आणि त्यांच्या अत्यावश्यक गरजांची पूर्तता करायची!
फ्रेंच न्यूज मॅगझिन ‘पॅरिस मॅच’चे पत्रकार रेजिस जेंते यांनीदेखील म्हटलं आहे की, पुतिन यांचे मलमूत्र ‘सांभाळण्यासाठी’, त्याची गुप्तता ठेवण्यासाठी खास ‘फेडरल प्रोटेक्शन एजंट्स’ची नियुक्ती करण्यात आली आहे. पुतिन परदेश दौऱ्यावर असतानाही त्यांच्या मलमूत्राचा कोणताही अवशेष मागे न ठेवता पुन्हा मायदेशी घेऊन येणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे. या मॅगझिनमध्ये दावा करण्यात आला आहे की, पुतिन यांनी २०१७ मध्ये जेव्हा फ्रान्सचा दौरा केला होता त्यावेळी आणि २०१९ मध्ये सौदी अरेबियाला त्यांनी भेट दिली होती, त्यावेळी त्यांच्या मलमूत्राचे कोणतेही अवशेष मागे ठेवण्यात आले नव्हते, याबाबतचे पुरावे आमच्याकडे आहेत. बीबीसीच्या माजी पत्रकार फरिदा रुस्तमोवा यांनीही ट्विट करून म्हटले आहे की, पुतिन ज्या ज्यावेळी परदेश दौऱ्यावर जात, त्या त्यावेळी पोर्टेबल टॉयलेट सोबत नेतात, याविषयी मला सांगण्यात आले होते. हे मलमूत्र पुन्हा रशियात आणण्यापेक्षा काहीवेळा त्या त्या देशातच ते नष्ट करण्यात आले होते, असा दावाही सूत्रांनी केला आहे.
पुतिन यांना नेमक्या कोणत्या आजारानं ग्रासलं आहे, याबाबत अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर त्यात वाढ झाली आहे. गेल्या महिन्यातच रशियाच्या ‘द प्रोजेक्ट’ या नियतकालिकाच्या पत्रकारांनीही पुतिन गंभीर आजारी आहेत आणि गुप्तपणे ते कॅन्सरतज्ज्ञाला भेटत असतात, याबद्दलची ‘बातमी’ फोडली होती. पुतिन स्वत:ला ‘स्थिर’ ठेवण्यासाठी कायम टेबलाचा आधार घेतात. त्यांची ही कृती म्हणजे त्यांची प्रकृती ढासळत असल्याचीच निशाणी आहे, असा दावाही पत्रकारांतर्फे केला जातोय. खरंखोटं पुतिन यांनाच माहीत, पण त्यांच्या रहस्यमय व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्यांच्या प्रकृतीचं गूढही अधिकाधिक गडद होत चाललं आहे.
‘सिक्रेट’ नेमकं आहे तरी काय?
२०१९ मध्ये पॅरिस येथे आयोजित ‘युक्रेन समिट’मध्ये पुतिन यांच्याबरोबर त्यांच्या सहा बॉडीगार्ड्ंसना टॉयलेटमध्ये जाताना पाहण्यात आलं होतं. त्यातल्या पाचजणांची जबाबदारी त्यांच्या सुरक्षेची होती. पुतिन टॉयलेटमधून बाहेर आल्याबरोबर सहावा बॉडीगार्ड टॉयलेटमध्ये गेला होता. एका माजी पत्रकारानं दावा केला आहे की, ही नवी गोष्ट नाही. पुतिन यांनी जेव्हापासून रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी घेतली तेव्हापासूनच ते पोर्टेबल टॉयलेट स्वत:सोबत ठेवतात!