शार्कने खाल्ला माट्टेओचा उजवा पाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 08:40 AM2023-12-19T08:40:53+5:302023-12-19T08:41:17+5:30

सेव्हन्टीन सेव्हन्टी (१७७०) हा ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅण्ड राज्यातला समुद्रकिनारा जगभर प्रसिद्ध आहे. पट्टीचे पोहणारे या समुद्रकिनाऱ्याकडे आकर्षित होतात.

The shark ate Matteo's right leg! | शार्कने खाल्ला माट्टेओचा उजवा पाय !

शार्कने खाल्ला माट्टेओचा उजवा पाय !

सेव्हन्टीन सेव्हन्टी (१७७०) हा ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅण्ड राज्यातला समुद्रकिनारा जगभर प्रसिद्ध आहे. पट्टीचे पोहणारे या समुद्रकिनाऱ्याकडे आकर्षित होतात. या समुद्रात जेव्हा मध्यम ते मोठ्या उंचीच्या लाटा उसळत असतात तेव्हा पोहणारे त्यात पोहण्याचा आनंद घेतात, तर समुद्रात लाटा उसळत नसतात  लहान मुलांना त्यांचे आई- बाबा पोहायला घेऊन येतात. या समुद्रकिनाऱ्यावर ८ डिसेंबर रोजी एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून व्हायरल झाल्याने त्याची चर्चा जगभर झाली. ज्याच्यासोबत हा अपघात घडला त्यानेच हा व्हिडीओ बनवला आणि व्हायरल केला. आपण आता मरणार आहोत तर  जवळच्या लोकांना किमान  ‘गुडबाय’ तरी म्हणावे म्हणून त्याने हा व्हिडीओ केला आणि  शेअर केला.  व्हिडीओ करताना त्याला मरणयातना होत होत्या आणि मृत्यूच्या खाईत ढकलणारा तो पुन्हा कधीही हल्ला करण्याची शक्यता होती. त्याआधी त्याला ‘त्या राक्षसाच्या तावडीतून मी सुटून जिवंत राहीन असे काही मला वाटत नाही.  मला तुम्हाला ­गुडबाय म्हणायचे आहे!’ हे त्याला सांगायचे होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकांना हादरा बसला ते त्याच्या तोंडातले शब्द ऐकून नव्हे तर व्हिडीओतील दृश्य बघून. रक्ताळलेल्या पाण्यात कसाबसा हातातला फोन सांभाळून तो बोलत होता.

त्याचे नाव माट्टेओ मारिओट्टी. हा २० वर्षांचा तरुण इटलीमध्ये राहणारा. ‘मरीन बायोलाॅजी’ शिकणारा माट्टेओ ऑस्ट्रेलियात आला होता ते पर्यटन आणि अभ्यास अशा दोन्हींसाठी.  ८ डिसेंबरला ईशान्य ऑस्ट्रेलियात असलेल्या या जगप्रसिद्ध १७७० समुद्रकिनाऱ्यावर पाणीबुडीचा आनंद घेण्यासाठी आला होता. या समुद्रकिनाऱ्याच्या अगदी मध्यावर तो पाणबुडीचे सर्व साहित्य घेऊन उतरला होता. तो थोडा दूर गेल्यानंतर त्याला त्याच्या दोन्ही पायांत प्रचंड वेदना जाणवायला लागल्या. आपला पाय ओढला जातोय हे लक्षात आल्यावर  तो  हादरला. संपूर्ण पाणी लाल रंगाचे झाले होते. शार्क माशाने माट्टेओला दंश केला होता. त्याचा उजवा पाय गुडघ्यापासून खाली पूर्ण नाहीसा झाला होता तर डाव्या पायालाही शार्क माशाने गंभीर दंश केला होता. माट्टेओला हलताही येत नव्हते. आपण शार्क आपल्याला संपवणार हे त्याला माहीत होते. त्यामुळे मोबाइलमधील कॅमेऱ्यावर त्याने अखेरचा संदेश मरणयातना होत असतानाही शूट केला आणि जोरजोराने आपल्या मित्राला मदतीसाठी हाक मारू लागला. 

त्याचा मित्रही बावरून गेला. त्याला कसे तरी समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढून वैद्यकीय मदत मागवली गेली. मार्टिन केली हे क्वीन्सलॅण्ड ॲम्ब्युलन्स सर्व्हिसचे वरिष्ठ कार्यकारी निरीक्षक मदतीसाठी धावून आले. त्यांनी इतके भयंकर दृश्य  यापूर्वी कधीही बघितलेले नव्हते. मोट्टोओ जवळ पाण्याखाली श्वास घेता यावा यासाठी असलेली पाणबुडीची ऑक्सिजन नळी शार्कच्या तोंडामध्ये फसल्यामुळे शार्कने त्याच्यावर पुन्हा हल्ला केला नाही आणि त्यामुळे त्याला पाण्याच्या बाहेर काढून दवाखान्यात नेणे शक्य झाले.  दवाखान्यात नेईपर्यंत माट्टेओ बेशुद्ध झाला होता.  शुद्धीवर आला तेव्हा तो  जिवंत होता पण त्याने  आपले दोन्ही पाय गमावले होते. 

माट्टेओवर दीर्घकाळ उपचार करण्याची गरज असल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे. शिवाय हे उपचारही खूप खर्चिक आहेत. माट्टेओच्या मित्रांनी सोशल मीडियाचा आधार घेऊन आपल्या मित्रावर ओढवलेला प्रसंग सांगून त्याच्या उपचारासाठी मदत मागितली. एव्हाना माट्टेओच्या मित्रांनी ६०,००० युरो जमवले आहेत. माट्टेओची तब्येत थोडी स्थिरावल्यावर तो वडील, मावशी अणि मित्रासोबत इटलीला परतला आहे. जाताना त्याने पुन्हा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तो म्हणतो, ‘मी ऑस्ट्रेलिया सोडून इटलीला जात आहे, ऑस्ट्रेलियातल्या १७७० ने आयुष्यभर पुरेल असा धडा मला शिकवला आहे.’ 
१७७० समुद्रकिनाऱ्यावर शार्कने हल्ला केला त्याच्या एक आठवडा आधी ऑस्ट्रेलियात असाच एका पोहणाऱ्या व्यक्तीवर हल्ला झाला होता. शार्क माशाने हल्ले करणे ही गोष्ट दुर्मीळ नाही. २०२३ मध्ये शार्क माशाच्या हल्ल्याच्या ५७ घटना घडल्या आहेत. त्यातल्या ५ जीवघेण्या होत्या. त्यामुळे समुद्रात जाताना लोकांनीच काळजी घ्यायला हवी, हे खरे!  

चूक शार्कची नाही, माणसाचीच! 
मुळात माट्टेओ १७७० समुद्रकिनाऱ्यावर जिथे पोहोत होता ती जागा आणि वेळ चुकीची होती. पावसाळ्यानंतर पाण्याच्या प्रवाहाने शार्क माशांचे अन्न वाहून गेलेले असते. अशा वेळेस भुकेने चवताळलेले शार्क मासे अन्न शोधण्यासाठी पहाटे लवकर आणि संध्याकाळी पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. त्यादरम्यान माणसाने काही चूक केली तर शार्क मासे असे जीवघेणे हल्ले करतात.  आपण शार्क माशांच्या पर्यावरणात प्रवेश केल्यावर त्यांचा विचार करून थोडे नियम पाळायला हवेत असे तज्ज्ञांचे म्हणणे  आहे.

Web Title: The shark ate Matteo's right leg!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.