अंतराळयान येणार, पण सुनीता विल्यम्सशिवाय, बोइंगच्या नादुरुस्त अंतराळयानाच्या परतीचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 12:48 PM2024-09-06T12:48:28+5:302024-09-06T12:49:58+5:30
NASA News: अंतराळात सध्या अडकून पडलेली भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स आणि बुच विल्माेर यांची पृथ्वीवर परतण्याची शक्यता गुरुवारी पुन्हा एकदा मावळली.
केप कॅनव्हरल - अंतराळात सध्या अडकून पडलेली भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स आणि बुच विल्माेर यांची पृथ्वीवर परतण्याची शक्यता गुरुवारी पुन्हा एकदा मावळली.
बोइंगचे नादुरुस्त अंतराळयान या आठवड्याच्या अखेरीस पृथ्वीवर परत आणण्याचा प्रयत्न केला जाणार असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव यात कुणीही अंतराळवीर नसतील. त्यामुळे दोघांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मुक्काम आणखी वाढला आहे. याच यानाने दोन्ही अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर रवाना झाले होते.
फेब्रुवारीपर्यंत पाहावी लागणार वाट
नियोजनानुसार सुनीता विल्यम्स आणि विल्मोर हे दोघे बोइंगच्या यानाने गेल्या ५ जून रोजी एक आठवड्याच्या मोहिमेवर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले होते. मात्र, त्यानंतर या यानात काही दोष आढळल्याने या दोघांचा परतीचा प्रवास लांबत गेला. आता स्पेस एक्सच्या यानाने ते परत येतील, परंतु त्यासाठी फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
हे यान पृथ्वीवर सुरक्षित परत यावे यासाठी संपूर्ण तयारी झाली असल्याचे अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने म्हटले आहे. सहा तासांत हे यान न्यू मेक्सिकोमध्ये उतरेल, असे अपेक्षित आहे. सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना फेब्रुवारीमध्ये ‘स्पेस एक्स’च्या यानाने पृथ्वीवर परत आणले जाईल.