“भारताच्या विकासाचा वेग संपूर्ण जगाला दिसेल,” अमेरिकन अब्जाधीशानं केलं अर्थव्यवस्थेचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 11:52 PM2023-02-16T23:52:13+5:302023-02-16T23:52:44+5:30
भारताचा विकास दर जगातील सर्वात वेगवान असेल, असे ते म्हणाले.
अमेरिकन अब्जाधीश रे डॅलिओ यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक केले आहे. गल्फ न्यूजच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन अब्जाधीश रे डॅलिओ यांनी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2023 दरम्यान सांगितले की, भारताचा विकास दर जगातील सर्वात वेगवान असेल. “उर्वरित जगाच्या तुलनेत भारतात सर्वात मोठा बदल पाहायला मिळेल,” असे रे डालिओ म्हणाले. 'सरकार आणि बदलती जागतिक व्यवस्था' या विषयावरील सत्रादरम्यान, डॅलिओ यांनी या विषयावर भाष्य केले. भारताची आगामी वर्षांमध्ये सर्वात मोठी वाढ होईल. भारताचे भविष्य उज्ज्वल असल्याचे ते म्हणाले. गेल्या 10 वर्षांच्या अभ्यासानुसार आणि आपण देशासाठी जे पाहत आहोत त्या आधारावर भारताचा विकास दर सर्वात मोठा आणि वेगवान असेल. या देशात उर्वरित जगाच्या तुलनेत सर्वात मोठा बदल दिसेल, असेही त्यांनी नमूद केले.
“”सत्ता संघर्षात गुंतलेल्या अमेरिका आणि चीन हे मागे राहतील. येत्या काही वर्षांत भारत विकासाच्या दृष्टीने वेगाने प्रगती करू शकेल,” असे ब्रिजवॉटर असोसिएट्सचे संस्थापक रे डॅलिओ म्हणाले. युएईचे कॅबिनेट व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल्ला अल गेर्गावी यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान डॅलियो म्हणाले की, “जे देश युद्धापासून दूर राहतात त्यांना फायदा होईल. भारताचा विकास दर चांगला आहे. आगामी काळात पुढे जाण्याची भारताकडे पूर्ण क्षमता आहे.”
कोण आहेत डॅलिओ?
रे डॅलिओ ब्रिजवॉटर असोसिएट्सचे को-चेअरमन आणि चीफ इन्व्हेस्टमेंट अधिकारी आहेत. ब्रिजवॉटर असोसिएट्स फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह कार्यक्रमाचा एक भाग होता. त्याला 'डेव्होस इन द डेझर्ट' असेही म्हणतात. विविध देशांतील हायप्रोफाईल लोक यात भाग घेतात. रे डॅलिओ यांनी यापूर्वीही अनेक प्रसंगी भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक केले आहे. त्यांच्या मते भारतीय अर्थव्यवस्था खूप मजबूत आहे.