सारांश: एका लोकप्रिय उंदराची कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 11:39 AM2022-05-15T11:39:37+5:302022-05-15T11:40:44+5:30

मिकी माऊस पडद्यावर सर्वप्रथम अवतरला 15 मे 1928 रोजी. या घटनेला आज, रविवारी 94 वर्षे पूर्ण झाली. 2028 साली मिकी माऊसची शताब्दी साजरी होईल.

the story of a popular mickey mouse | सारांश: एका लोकप्रिय उंदराची कथा

सारांश: एका लोकप्रिय उंदराची कथा

googlenewsNext

समीर परांजपे, मुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबई

मिकी माऊस. लहानापासून वडीलाधाऱ्यांच्या ओठावर हसू फुलविणारे वॉल्ट डिस्ने यांनी निर्मिलेले एक कार्टून पात्र. असे म्हणतात की प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात काहीशा अपयशानेच होते. मिकी माऊसचेही तसेच झाले. तो पडद्यावर सर्वप्रथम अवतरला १५ मे १९२८ रोजी तोही टेस्ट स्क्रिनिंगसाठी. या घटनेला आज, रविवारी ९४ वर्षे पूर्ण झाली. २०२८ साली मिकी माऊसची शताब्दी साजरी होईल. प्लेन क्रेझी नावाच्या कार्टूनपटात मिकी माऊस पहिल्यांदा पडद्यावर अवतरला. पण कोणालाच फारसा आवडला नाही.

मिकी माऊसचे पात्र असलेला दी गलोपिन गाचो हा दुसरा कार्टूनपट वितरकच उपलब्ध न झाल्याने झळकलाच नाही. त्यानंतर मिकी माऊस तिसऱ्यांदा दिसला स्टीमबोट विली या कार्टूनपटात. त्या कार्टूनपटाचे नशिब थोरच म्हणून त्याला वितरक लाभला व मिकी माऊस अमेरिकेत चित्रपटगृहांच्या पडद्यावर १८ नोव्हेंबर १९२८ रोजी झळकला. त्यामुळे स्टीमबोट विली हाच डिस्ने कंपनीनिर्मित मिकी माऊसचा सर्वार्थाने पहिला चित्रपट मानला जातो. या चित्रपटात मिकी माऊसच्या डोळ्यांच्या रेखाटनात बदल झाला. त्याच्या डोळ्यांच्या जागी दोन मोठे काळे ठिपके चितारण्यास सुरुवात झाली. आणि हे त्याचे रंगरूप आजही तसेच कायम आहे.

मिकी माऊसचा जन्म हा अडचणीवर मात करण्याच्या गरजेतून झाला. डिस्ने स्टुडिओने ओस्वाल्ड दी लकी रॅबिट हे कार्टूनपात्र तयार करत असे. मात्र या पात्राचे हक्क युनिव्हर्सल पिक्चर्सकडे होते. वॉल डिस्ने यांना ही गोष्ट कुठेतरी डाचत होती. त्यामुळे दी लकी रॅबिटला पर्याय म्हणून मिकी माऊसचा जन्म झाला. वॉल्ट डिस्ने यांनी १९५४ साली म्हटले होते की, कोणीही एका गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये ते म्हणजे आपल्या आयुष्यात एका उंदरामुळे (मिकी माऊस) भरभरून आनंद मिळाला आहे.

मिकी माऊस पडद्यावर पहिल्यांदा बोलला ते त्याचे निर्माते वॉल्ट डिस्ने यांच्याच आवाजात. तो सिलसिला १९४६ पर्यंत सुरू राहिला. मात्र त्यानंतर जिमी मकडोनाल्डने मिकी माऊसला आवाज द्यायला सुरुवात केली. मिकी माऊस १९५५ ते १९५९ या कालावधीत पुन्हा आपला निर्माता वॉल्ट डिस्नेच्याच आवाजात एबीसी वाहिनीवर सुरू असलेल्या दी मिकी माऊस क्लब या कार्यक्रमात बोलू लागला. १९३५पासून रंगीत कार्टून फिल्म बनविणे सुरू झाले. तसेच वॉल्ट डिस्ने यांच्या इतर कार्टून पात्रांप्रमाणे मिकी माऊसही रंगीबेरंगी झाला. कृष्णधवल जमान्यात तो जसा गोड, खट्याळ होता तसाच अगदी रंगीत रंगसंगतींमध्येही राहिला. मिकी माऊसवर पहिले कॉमिक १९३०च्या दशकाच्या प्रारंभी प्रसिद्ध झाले.

इंटरनेट युगातही मोठी लोकप्रियता

मिकी माऊसची लोकप्रियता जगभर विलक्षण वाढलेली आहे. २०१३ साली डिस्ने चॅनेलने मिकी माऊसच्या कार्टून फिल्म टीव्हीवरून दाखवायला सुरुवात केली व तिथेही या पात्राने लोकप्रियतेचा कळस गाठला. १९५५मध्ये अमेरिकेत डिस्ने पार्क सुरू झाले. तिथे आजवर लोकांचे मन सर्वाधिक रिझविले ते मिकी माऊसने. त्याच्यावर अंदाजे ४० तरी चित्रपट निघाले असावेत. इंटरनेटच्या युगातही मिकी माऊस युट्युब किंवा अन्य समाजमाध्यमांत अतिशय लोकप्रिय कार्टून पात्र आहे. लोकांना हसविण्याचे वरदान घेऊनच मिकी माऊस जन्माला आला.

Web Title: the story of a popular mickey mouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.