एका पुरुषाच्या, एकाच वेळी ९ लग्नांची गोष्ट! नेमकी भानगड काय? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 06:59 AM2022-04-15T06:59:09+5:302022-04-15T06:59:21+5:30
लग्न हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा प्रसंग. तो धुमधडाक्यात साजरा व्हावा, ही अनेकांची इच्छा असते.
लग्न हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा प्रसंग. तो धुमधडाक्यात साजरा व्हावा, ही अनेकांची इच्छा असते. आयुष्यात सामान्यपणे ‘एकदाच’ येणारा हा प्रसंग अविस्मरणीय व्हावा, यासाठी सारेच जण आटापिटा करतात. असं असलं तरी काही जणांसाठी ‘लग्न करणं’ हीच त्यांची सर्वात मोठी महत्त्वाकांक्षा असते. काही जणांसाठी तर ते ‘सोशल स्टेट्स’ही असतं. पूर्वीच्या काळी याचमुळे अनेक राजांना अनेक राण्या असायच्या. ज्या राजाला जास्त राण्या, त्याचा मानही मोठा समजला जायचा. कालांतरानं नवनवीन कायदे आले, लग्नांच्या संख्यांवर मर्यादा आली, बहुतेक देशात तर अपवादात्मक परिस्थिती वगळता एकापेक्षा जास्त लग्न गुन्हा मानला जाऊ लागला.. तरीही एकापेक्षा जास्त लग्न करणारे लग्नेच्छुक लोक अजूनही दिसून येतात.
अर्थातच त्यात पुरुषांची संख्या जास्त आहे. आर्थर ओ उर्सो नावाच्या एका ब्राझिलियन मॉडेलनं गेल्या वर्षी एकाच वेळी नऊ बायकांशी विवाह केला होता. त्यामुळे संपूर्ण जगभरात तो चर्चेत आला होता. या सगळ्या तरुण नऊ बायकांनी त्याच्याशी आनंदानं एकाच वेळी विवाह केला होता आणि त्याच्यासोबत गुण्यागोविंदानं त्या नांदतही होत्या.. आजच्या काळात असा प्रसंग घडणं अनेकांसाठी आश्चर्यजनक होतं, त्यामुळे आर्थरचा हा ‘सामुदायिक’ विवाह सोशल मीडियावर खूप गाजला होता आणि त्याचे व्हिडीओ, फोटोही जगभर शेअर झाले होते.
आता हाच आर्थर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं कारण या नऊ बायकांमधील अगाथा या त्याच्या एका बायकोनं आर्थरपासून विभक्त होण्याचा निर्णय तिनं घेतला आहे आणि तिनं वेगळं राहायचं ठरवलं आहे. या घटनेचा आर्थरलाही धक्का बसला आहे आणि तो खूप दु:खी झाला आहे. त्याचं म्हणणं, माझी ही बायको फारच ‘स्वार्थी’ निघाली. माझं इतर पत्नींबरोबरचं शेअरिंग तिला नको होतं. इतरांना सोडून मी फक्त तिच्यासोबतच राहावं, अशी तिची इच्छा होती. हे कसं शक्य होतं? मी या गोष्टीला नकार दिल्यावर तिनं माझ्याशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अर्थातच एका लग्नाची ही कमी आर्थर लवकरच भरून काढणार आहे. त्याचं म्हणणं आहे, लहानपणापासूनच मला किमान दहा बायका असाव्यात, असं माझं स्वप्न होतं. येत्या काही दिवसात मी आणखी दोन लग्नं करीन आणि दहा बायकांची माझी इच्छा मी पूर्ण करीन.
‘फ्री लव्ह’चा प्रचार आणि एकपत्नित्व प्रथेचा विरोध करण्यासाठी गेल्या वर्षी त्यानं एकाच वेळी नऊ तरुणींशी विवाह केला होता. त्याच्या या जगावेगळ्या इच्छेला या नऊ बायकांनी पाठिंबाही दर्शविला होता. या नऊपैकी एका बायकोपासून त्याला एक मुलगाही आहे. पण आपल्या प्रत्येक बायकोपासून आपल्याला किमान एक तरी मूल व्हावं, अशी त्याची इच्छा आहे. तसं जर झालं नाही, तर इतर बायकांवर तो अन्याय ठरेल, असं त्याचं म्हणणं आहे.
एकीकडे आर्थर आणि अगाथा यांच्या विभक्त होण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली असली, तरी हे लक्षात घेतलं पाहिजे की, ब्राझीलमध्येही एकापेक्षा जास्त लग्न कायदेशीर नाहीत. म्हणजे त्यानं केलेले हे नऊ विवाह कायद्याच्या दृष्टीनं वैध नाहीत, तरीही त्यानं आणि त्याच्या बायकांनी हे विवाह केले आहेत. पुढे त्याचे कायदेशीर काय परिणाम होतील, हे अजून स्पष्ट नाही.
आर्थरच्या इतर आठ बायकांनाही अगाथाचं असं स्वार्थी वागणं पसंत नाही. त्यांचं म्हणणं आहे, अगाथानं एकटीनंच आमच्या नवऱ्याला पळवून नेणं, हे आम्हाला कसं मान्य होईल? तिचा हा दृष्टिकोन अत्यंत चुकीचा आहे. तिला जर आमच्या सर्वांसोबत राहायचं असेल, तर तिला घरात स्वीकारायला आमची आजही तयारी आहे. आर्थरचंही म्हणणं आहे, अगाथाला खरं तर माझी भूमिका सुरुवातीपासूनच मान्य नसावी. या लग्नातून तिला केवळ प्रसिद्धी आणि ‘ॲडव्हेंचर’ हवं होतं.. माझं माझ्या सगळ्याच बायकांवर सारखंच प्रेम आहे. अगाथासाठी इतरांना सोडणं योग्य होणार नाही..
आर्थरचं म्हणणं काहीही असो, एकाच वेळी इतक्या बायकांशी लग्न करण्याची त्याची वृत्ती पुरुषप्रधान मानसिकतेचं प्रतीक आहे. अनेक हुकूमशहांमध्ये हीच प्रवृत्ती असते. त्यामुळे त्यांनी एकापेक्षा जास्त लग्न केल्याची अनेक उदाहरणं दिसतात.
लिबियाचे हुकूमशहा मोहम्मद गद्दाफी हे देखील कायम तरुणींच्याच गराड्यात राहणं पसंत करायचे. त्यांनी दोन अधिकृत लग्नं केली होती, पण त्यांची इतर प्रेमप्रकरणंही चर्चेत होती. त्यांनी तर आपल्या सुरक्षेसाठी तरुण, सुंदर मुलींची एक फौजच तयार केली होती. युगांडाचा क्रूर हुकूमशहा इदी अमीन यानेही पाच विवाह केले होते. याशिवाय त्याच्याकडे एक ‘हरम’देखील होता, जिथे ३० महिला राहत होत्या.
आजार नव्हे, ‘पर्सनॅलिटी प्रॉब्लेम’!
एकापेक्षा जास्त विवाह करण्यासंदर्भात तज्ज्ञांचं म्हणणं आहे, बऱ्याचदा पुरुषांमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ब्रेन फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. सम्राट कार यांच्या मते, ‘बढाई’ मारण्यासाठीच पुरुष असं करतात. आपल्याला जास्त बायका किंवा ‘गर्लफ्रेण्ड्स’ असण्याचा संबंध ते आपल्या ‘सोशल स्टेट्स’शी जोडण्याचा प्रयत्न करतात. हा आजार जरी नसला, तरी तो ‘पर्सनॅलिटी प्रॉब्लेम’ नक्की आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.