ट्रम्प आणि पोर्न स्टार ‘हनीबंच’ यांचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 08:35 AM2024-05-11T08:35:13+5:302024-05-11T08:37:31+5:30

सार्वजनिक जीवनात असणाऱ्या माणसाचं चारित्र्य, त्याचं वर्तन आणि त्याची कृती अतिशय स्वच्छ, पारदर्शक असली पाहिजे, अशी अपेक्षा असते. सार्वजनिक ...

The story of Trump and porn star 'Honeybunch' | ट्रम्प आणि पोर्न स्टार ‘हनीबंच’ यांचा किस्सा

ट्रम्प आणि पोर्न स्टार ‘हनीबंच’ यांचा किस्सा

सार्वजनिक जीवनात असणाऱ्या माणसाचं चारित्र्य, त्याचं वर्तन आणि त्याची कृती अतिशय स्वच्छ, पारदर्शक असली पाहिजे, अशी अपेक्षा असते. सार्वजनिक जीवनातील ही व्यक्ती जेवढ्या जास्त उंचीवर तितक्या प्रमाणात ही अपेक्षा आणखी वाढत जाते. हीच व्यक्ती जर एखाद्या देशाची राष्ट्राध्यक्ष, माजी राष्ट्राध्यक्ष असेल तर? आणि हा देशही जगाला सर्वच बाबतीत ‘आचरणा’चे धडे देणारा अमेरिकेसारखा सर्वांत बलाढ्य देश असेल तर?

काही वर्षांपूर्वी बिल क्लिंटन यांच्या सेक्स प्रकरणामुळे आख्ख्या जगभरात वादळ उठलं होतं. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी तर सगळ्या मर्यादा अक्षरश: पार केल्या. चारित्र्यापासून, भ्रष्टाचारापासून ते अगदी टॅक्सची चोरी, पुरावे नष्ट करणे आणि बलात्कारापर्यंत अशा अनेक गोष्टींचे आरोप त्यांच्यावर झाले आहेत. त्याबद्दलचे खटलेही त्यांच्याविरुद्ध चालवण्यात आले. काही खटले सुरूही आहेत. 

अमेरिकेत सध्या माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सशी जबरदस्तीनं ठेवलेले लैंगिक संबंध, २०१६च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या आधी स्टॉर्मीनं या संबंधांबाबत कुठलीही वाच्यता करू नये आणि आपलं तोंड तिनं बंद ठेवावं यासाठी तिला देण्यात आलेली लाच, याबाबतची सुनावणी मॅनहॅटन कोर्टात सुरू आहे. 
पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स आणि तिच्याशी बळजबरीनं ठेवलेल्या लैंगिक संबंधाचा किस्सा तसा २००६मधील आहे. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील एक बडे प्रस्थ होते. स्टॉर्मी त्यावेळी फक्त २७ वर्षांची होती, तर ट्रम्प यांचं वय होतं ६० वर्षे. एका गोल्फ टुर्नामेंटच्या वेळी या दोघांची भेट झाली होती. त्यावेळी नेमकं काय झालं होतं, याबाबत सध्या सनावणी सुरू आहे. तब्बल पाच तासांच्या सुनावणीत स्टॉर्मीनं अनेक गोष्टी उघड केल्या. स्टॉर्मीनं सांगितलं, या गोल्फ टुर्नामेंटच्या वेळी माझी आणि ट्रम्प यांची भेट झाल्यानंतर ट्रम्प यांनी भेटण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी म्हणून मला हॉटेलमध्ये बोलवलं. मी हॉटेलमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला तर ट्रम्प यांचं वर्तन फारसं आक्षेपार्ह नव्हतं. आमच्या बराच वेळ गप्पा झाल्या. त्यात हसी-मजाकही झाली. 

गप्पांच्या ओघात टम्प यांनी त्यांची पत्नी, त्यांच्याशी ‘बिघडलेलं’ त्यांचं खासगी नातं आणि इतरही अनेक कौटुंबिक तसेच खासगी गोष्टी मला सांगितल्या. गप्पा संपवून मी ज्यावेळी जायला निघाले, त्यावेळी अचानक त्यांनी मला अडवलं, मी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला जाऊ दिलं नाही आणि माझ्याशी लैंगिक दुर्वर्तन केलं. स्टॉर्मीनं हे याआधीही सांगितलं आहे; पण कोर्टात ट्रम्प प्रत्यक्ष समोर असताना तिनं पहिल्यांदाच याबाबतची साक्ष दिली आहे. अर्थातच ट्रम्प यांनी पूर्वीही आणि आताही या ‘कपोलकल्पित’ गोष्टींशी माझा काहीही संबंध नाही, असं सांगताना माझं राजकीय आयुष्य बरबाद करण्यासाठी आणि राजकारणातून मला उठवण्यासाठी विरोधकांनी रचलेलं षड्यंत्र असल्याचा आरोप केला. 

स्टॉर्मी जेव्हा कोर्टात या घटनेबाबतचा आपला अनुभव सांगत होती, त्यावेळी ट्रम्प यांनी तिच्याविषयी अनेक वेळा अपशब्द वापरल्याचंही माध्यमांनी प्रसिद्ध केलं आहे. स्टॉर्मीचं हे वक्तव्य खोटं असून केवळ पैशासाठी ती असे आरोप करीत असून तिच्या ‘विश्वासार्हते’बद्दलही ट्रम्प यांच्या वकिलांनी शंका व्यक्त केली. 
याबद्दल स्टॉर्मी ही ट्रम्प यांना ब्लॅकमेल करीत असल्यामुळेच याआधी तिला एक लाख तीस हजार डॉलर (सुमारे एक कोटी सात लाख रुपये) देण्यात आले होते असंही ट्रम्प यांच्या वकिलांनी सांगितलं होतं. मात्र स्टॉर्मीला पैसे दिल्यामुळे आपलं झालेलं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी ट्रम्प यांनी आपल्या बिझिनेस रेकॉर्डसमध्ये झोलझाल केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. 

स्टॉर्मीचं म्हणणं आहे, त्यावेळीही ट्रम्प यांची मोठी दहशत होती. मी पैशांसाठी नव्हे, तर त्यांच्या धाकामुळे आणि भीतीमुळेच तिथे गेले होते. मी जेव्हा ट्रम्प यांच्या हॉटेलच्या रूममधून बाहेर पडले, त्यावेळी माझे हात-पाय भीतीनं थरथर कापत होते, इतके की मी माझे बूटही नीट घालू शकले नाही. त्या घटनेची मी कोणाकडे वाच्यताही करू शकले नाही; कारण ट्रम्प यांची मला फारच भीती वाटत होती..

ते मला ‘हनीबंच’ म्हणायचे !...
स्टॉर्मीचं म्हणणं आहे, हे प्रकरण इथेच थांबलं नाही. ट्रम्प यांच्या ऑफिसमधून त्यानंतरही मला अनेकदा फोन आले. ट्रम्प मला म्हणायचे, तुला पाहिल्यावर मला माझ्या मुलीची आठवण येते. तूदेखील अतिशय सुंदर आहेस; पण तुझ्या सौंदर्याची कोणी कदर करत नाही. ज्या ज्यावेळी त्यांच्याशी संभाषण झालं, त्या त्या प्रत्येक वेळी ते मला ‘हनीबंच’ म्हणून हाक मारायचे! स्टॉर्मी प्रकरण ट्रम्प यांना भोवणार असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे.

Web Title: The story of Trump and porn star 'Honeybunch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.