साखरझोपेत क्षणात झाले हाेत्याचे नव्हते; भूकंपाचा तीव्र धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 07:01 AM2023-09-10T07:01:02+5:302023-09-10T07:01:51+5:30
मोराेक्कोत ७.२ रिश्टरचा भूकंप; १०३७ जणांचा मृत्यू; १२०० हून अधिक जखमी
रबात (माेराेक्काे) : साखरझाेपेत असताना अचानक जमिनीला हादरे बसू लागतात. काही कळायच्या आत सारे काही संपलेले असते. आफ्रिकेतील माेराेक्काे या देशाला शुक्रवारी रात्री उशिरा ७.२ रिश्टर एवढ्या जबरदस्त तीव्रतेच्या भूकंपाने हादरा दिला.
भूकंपामुळे १०३७ पेक्षा जास्त लाेकांचा मृत्यू झाला असून, १२०० पेक्षा जास्त लाेक जखमी झाले आहेत. २०० पेक्षा जास्त लाेकांची प्रकृती गंभीर आहे. भूकंपाची तीव्रता एवढी प्रचंड हाेती की, अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे काेसळल्या. त्यात अजूनही शेकडाे लाेक दबले असण्याची शक्यता असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.. माेराेक्कोतील गेल्या १२० वर्षांतील हा सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप आहे. पाेर्तुगाल, अल्जेरिया व आजूबाजूच्या काही देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
सर्वत्र काेसळलेल्या इमारतींचा मलबा
भूकंपाचा फटका बसलेल्या शहरांमध्ये युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. नजर जाईल तिथे काेसळलेल्या इमारती दिसतात. मलब्यातून मृतदेह बाहेर काढले जात आहेत. पर्वतांवरील गावांमध्येही प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, तेथील माहिती मिळण्यास वेळ लागू शकताे.
भूकंपप्रवण नसूनही...
उत्तर आफ्रिकेच्या या भागात सहसा भूकंप हाेत नाही. मात्र, जेव्हा भूकंप झाला, तेव्हा माेठ्या प्रमाणावर प्राणहानी झालेली आहे. यापूर्वी १९६०मध्ये आलेल्या ५.८ रिश्टर भूकंपामध्ये हजाराे लाेकांचा मृत्यू झाला हाेता. सहसा भूकंप हाेत नसल्याने इमारतींचे बांधकाम भूकंपरोधक केले जात नाही.
आमच्या संवेदना
तुमच्या साेबत : माेदी
माेराेक्काेतील भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ‘माेराेक्काेमध्ये भूकंपामुळे झालेल्या प्राणहानीने अतिशय दु:ख झाले आहे. माझ्या संवेदना माेराेक्काेच्या लाेकांसाेबत आहेत. भारताकडून माेराेक्काेला मदत केली जाईल.’
जे बाहेर
पडले ते वाचले
स्थानिक वेळेनुसार रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी भूकंप झाला. जमिनीला हादरे बसू लागले. ज्यांना लक्षात आले, ते तातडीने घराबाहेर आले आणि वाचले. अनेक जण झाेपेतच असल्याने शेकडाेंचे प्राण गेले.