मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 09:37 AM2024-05-24T09:37:55+5:302024-05-24T09:38:14+5:30
गेल्या काही महिन्यांपासून उष्णतेने भारतीय उपखंडाला हैराण केले आहे. आता उत्तर भारतात पाकिस्तानातून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी तापविले आहे. घामही ...
गेल्या काही महिन्यांपासून उष्णतेने भारतीय उपखंडाला हैराण केले आहे. आता उत्तर भारतात पाकिस्तानातून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी तापविले आहे. घामही सुकून जाईल अशी उष्णता लोकांना सहन करावी लागत आहे. अनेक शहरांचे तापमान ४८ अंश सेल्सिअसवर गेले आहे. यात आता पाकिस्तानातून खळबळजनक बातमी येत आहे.
भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक असलेल्या मोहेंजोदडोमध्ये सूर्य तापला आहे. मोहेंजोदडोसह दादूमध्ये या सीझनमधील सर्वाधिक तापमान नोंद झाले आहे. या ठिकाणी पारा ५० डिग्री सेल्सिअसवर गेला आहे. तर पाकिस्तानातील अन्य शहरांत ४६ डिग्रीवर तापमान नोंद झाले आहे.
एकीकडे पश्चिम भारतात पावसाने दार ठोठावण्यास सुरुवात केलेली असताना उत्तर भारतात सूर्य आग ओकत आहे. पाकिस्तानच्या हवामान विभागाने ही उष्णतेची लाट आणखी आठवडाभर कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. बुधवारी मोहेंजोदडोतील तापमान ४८ डिग्री सेल्सिअस नोंदविले गेले होते.
महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटेचा इशारा
राज्यात एकीकडे वादळी वाऱ्यांचा पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज पुण्यासह सहा जिल्ह्यांमध्ये नागरिकांना उष्णतेच्या लाटांना सामोरे जावे लागणार आहे. तर विदर्भात वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यासह लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या चक्राकार वारे वायव्य इशान्य राजस्थान आणि पश्चिम विदर्भावर सक्रीय आहेत. परिणामी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. २३ ते २६ मेपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज विदर्भात तर २३ ते २५ पर्यंत मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांचा इशाराही देण्यात आला आहे.
मुंबई, पुण्यासह राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. परंतु पाऊस काही पडत नाही. तर कोकणात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. कोकणात मान्सूनची चाहूल लागली असून लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.