नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 06:17 AM2024-11-01T06:17:19+5:302024-11-01T06:17:50+5:30
चीनच्या ‘बँक नोट प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन’ या कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट नेपाळने दिले आहे. त्यामुळे ही कंपनी नेपाळमधील शंभर रुपयांच्या ३० कोटी नोटा छापणार आहे.
काठमांडू : नेपाळ राष्ट्रीय बँक या नेपाळच्या केंद्रीय बँकेने १०० रुपयांच्या नोटा छापण्याचे कंत्राट चीनच्या एका कंपनीला दिले आहे. चिनी कंपनीकडून छापण्यात येणाऱ्या नोटांवर भारतीय हद्दीतील लिपुखेल, लिंपियाधुरा व कालापानी ही तीन क्षेत्रे नेपाळचा भाग असल्याचे दाखवण्यात आल्याचा दावा एका वृत्तसंस्थेने केला आहे. त्यामुळे भारत-नेपाळमध्ये पुन्हा एकदा सीमावादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. या क्षेत्राबाबत भारत आणि नेपाळमध्ये ३५ वर्षांपासून वाद सुरू आहे.
चीनच्या ‘बँक नोट प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन’ या कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट नेपाळने दिले आहे. त्यामुळे ही कंपनी नेपाळमधील शंभर रुपयांच्या ३० कोटी नोटा छापणार आहे. यासाठी नेपाळला ७५ कोटी भारतीय रुपये एवढा खर्च येणार आहे. याचा अर्थ शंभर रुपयांची एक नोट छापण्यासाठी नेपाळला २.५० भारतीय रुपये मोजावे लागणार आहेत. नेपाळ सरकारने मे महिन्यात चलनी नोटांमध्ये बदल करण्यास मंजुरी दिली होती. नेपाळच्या राष्ट्रीय बँकेकडे नोटा बदलण्याचा अधिकार आहे. असे असले तरी बँकेला नोटा छापण्यासाठी सरकारची मंजुरी घ्यावी लागते.