बंदुकीचा ट्रिगर मुलांचा घेतोय जीव! बंदूक आणि अमली पदार्थांच्या विषबाधेमुळे मृत्यूत मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 06:12 AM2023-10-07T06:12:38+5:302023-10-07T06:12:58+5:30
अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासानुसार गेल्या १० वर्षांमध्ये बंदुकीमुळे बालमृत्यूच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासानुसार गेल्या १० वर्षांमध्ये बंदुकीमुळे बालमृत्यूच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अमेरिकेत बंदूक आणि अमली पदार्थांच्या विषबाधेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये अनुक्रमे ८७ टक्के आणि १३३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. यावरुन अमेरिकेत चिंताही वाढली आहे.
२०११-२०२१ दरम्यान देशातील कार अपघातांमुळे होणारे मृत्यू जवळपास निम्मे झाले आहेत, तर बंदुकीच्या वाढत्या संस्कृतीमध्ये लहान मुलांमध्ये गोळीबार हे अपघाती मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. अमेरिकेतील हिंसाचाराशी संबंधित घटनांबाबत पीडियाट्रिक्स या नियतकालिकामध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.
ड्रग्जचे विष दुप्पट
२०२१ मध्ये २,५९० मुले आणि १८ वर्षांखालील किशोरवयीन मुलांचा गोळीबारामुळे मृत्यू झाला. २०११ मधील १,३११ घटनांपेक्षा हे प्रमाण खूप जास्त आहे. इतर विकसित देशांमध्ये लहान मुलांच्या मृत्यूच्या तीन प्रमुख कारणांमध्ये बंदुकांचा समावेश नाही.
याचवेळी मुलांमध्ये ड्रग्जचे विष दुप्पट झाले आहे. अनिवार्य सीटबेल्ट, बूस्टर सीट आणि एअरबॅगमुळे कार अपघातांपासून मुलांचे संरक्षण करण्यात यश आले आहे.
वाढलेली गरिबी मृत्यूला कारण
अमेरिकेत गोळीबारात मृत्यू झालेल्यांमध्ये बहुसंख्य मुले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे सुमारे दोन तृतीयांश मृत्यू हे हत्याकांडाचे होते. अनावधानाने केलेल्या गोळीबारातही अनेक मुलांना जीव गमवावा लागला. जिथे अधिक गरिबी आहे तेथे बंदुकींचे बळी जास्त आहेत.
गन लॉबीला नाही देणे-घेणे
बंदुकीमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी ट्रिगर लॉकसारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश केला जाऊ शकतो, पण बंदूक व्यापार उद्योग त्यासाठी तयार नाही. अनेक अभ्यासांत हे समोर आले की, बंदुकीच्या मालकीमुळे हत्या आणि आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.