Canada News: ट्रक मोर्चामुळे कॅनडामधील परिस्थिती बिघडली, पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंनी देशात आणीबाणी लावली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 07:49 AM2022-02-15T07:49:01+5:302022-02-15T08:03:14+5:30
Canada News: गेल्या दोन आठवड्यांपासून ट्रक आणि अन्य शेकडो वाहने घेऊन हजारो आंदोलनकर्त्यांनी कॅनडाची राजधानी ओटावाच्या रस्त्यांवर उतरत राजधानी ओटावाचे रस्ते बंद केले आहे. त्यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडामध्ये आणीबाणी लागू केली आहे.
ओटावा - कॅनडामध्ये कोरोनाबाबतच्या नियमांविरोधात सातत्याने आंदोलन होत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून ट्रक आणि अन्य शेकडो वाहने घेऊन हजारो आंदोलनकर्त्यांनी राजधानी ओटावाच्या रस्त्यांवर उतरत राजधानी ओटावाचे रस्ते बंद केले आहे. त्यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडामध्ये आणीबाणी लागू केली आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सांगितले की, ट्रक ड्रायव्हर आणि इतर लोकांचे तीव्र आंदोलन लक्षात घेता आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आंदोलकांनी राजधानी ओटावाला पांगळे बनवले आहे. देशात लागू असलेल्या कोरोनाच्या नियमावलीचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत आहे. पंतप्रधान ट्रुडो यांनी तत्पूर्वी कॅनडामधील प्रांतांच्या नेत्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले.
पंतप्रधान ट्रुडो यांनी सांगितले की, आंदोलनामुळे निर्माण झालेली परिस्थिती संपुष्टात आणण्यासाठी आणीबाणी लागू करण्यात येत आहे. मात्र हा खूप कठीण काळ आहे. असे निर्णय खूप कठीण काळात घेतले जातात. तसेच त्यांनी सांगितले की, या आंदोलनामुळे अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थिती धोकादायक कृतींना वाढू दिले जाऊ शकत नाही.