डोळ्यांत पाणी, ‘गोल्डन गेट ब्रिज’ची वारी थेट पंढरपूरला; बीएमएम अधिवेशनाचा शानदार समारोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 06:42 AM2024-07-02T06:42:08+5:302024-07-02T06:42:59+5:30

सुनील गावस्कर आणि सौरभ नेत्रावळकर एका व्यासपीठावर

The twenty-first Brihanmaharashtra Mandal session, which lasted for four days, came to a grand conclusion. | डोळ्यांत पाणी, ‘गोल्डन गेट ब्रिज’ची वारी थेट पंढरपूरला; बीएमएम अधिवेशनाचा शानदार समारोप

डोळ्यांत पाणी, ‘गोल्डन गेट ब्रिज’ची वारी थेट पंढरपूरला; बीएमएम अधिवेशनाचा शानदार समारोप

थेट अमेरिकेतून अपर्णा वेलणकर

सान होजे : ज्याची शैलीदार बॅटिंग टीव्हीवर ‘बघण्या’साठी एकेकाळी कित्येकदा खोट्या ‘सिक लिव्ह’ टाकल्या त्या सुनील गावस्कर याला (यांना नव्हे) मानाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सान होजेला जमलेल्या सहा हजार मराठी माणसांनी गेले चार दिवस रंगत गेलेल्या एकविसाव्या बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनाचा शानदार समारोप केला. 

‘आधारकार्ड इंडिया टीम’च्या सुनीलबरोबर ‘ग्रीन कार्ड इंडिया टीम’मधून मैदान गाजवणाऱ्या सौरभ नेत्रावळकरलाही त्यांनी या माहेरच्या मंचावर कौतुकाने बोलावले आणि खुद्द ‘सुनील सरां’कडून कौतुक ऐकताना भारावलेल्या नम्र सौरभला काय बोलावे हे सुचेना! अशीच निःशब्द अवस्था केली ती  महेश काळे, भगवान रामपुरे, अच्युत पालव आणि मुक्ता बर्वे यांनी रंगवलेल्या “अभंग वारी’ने! एकीकडे रामपुरे ओल्या मातीला आकार देत विठ्ठलाची मूर्ती ‘लाईव्ह’ घडवताहेत, दुसरीकडे अच्युत पालवांच्या  कॅनव्हासवर अक्षरातून विठ्ठल उभा राहतो आहे, मुक्ता तर बोलता बोलता थेट वारीमध्ये चालायला घेऊन गेली आहे आणि महेश काळेने उभ्या केलेल्या अभंगांच्या स्वर-कल्लोळाने उचंबळून आलेले काळीज दूर राहिलेल्या माहेराच्या आठवणीने हेलावून गेले आहे.

पायजे कशाला हेल्मेट ?
‘इतक्या डेंजर फास्ट बॉलर्सचा सामना केलास, पण आयुष्यात कधी हेल्मेट नाही वापरलेस... नाकापर्यंत बॉल उसळायचे, भीती नाही का वाटली?’ - मुलाखतकार  मंगेश जोशी यांच्या या प्रश्नावर गावस्करने काय उत्तर द्यावे?- अरे मंगेश, तू इतक्यांदा मला भेटला आहेस, तुला हे कळले नाही का की (स्वतःच्या डोक्याकडे बोट करत) ‘इथे’ आत काही नाहीये... कशाला लागतं हेल्मेट “- जुन्या आठवणी रंगवून सांगणाऱ्या या धमाल गप्पांमध्ये आधुनिक  क्रिकेटवर गावस्करने केलेली ही एकच पण टोकदार कमेंट !

माझी तीन स्वप्नं आहेत... 
सौरभ नेत्रावळकरचे प्रशिक्षक राज बडदरे मराठी अन् इथलेच. सुनील गावस्कर यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना त्यांना भरून आले. ते म्हणाले, माझी तीन स्वप्नं आहेत : भारताने २०२५ ची टेस्ट चॅम्पियनशिप जिंकावी , विमेन्स क्रिकेटचा वर्ल्ड कप  भारताने जिंकावा आणि २०२६ साली टीट्वेंटी वर्ल्ड कप फायनलमध्ये इंडिया अन् अमेरिका आमने-सामने असावेत!

..शेवटी  स्टेजवरून खाली उतरलेली विठ्ठलाची पालखी बघता बघता डोईला टोपी, कपाळावर अबीर बुक्क्याचा टिळा लावलेल्या माणसांच्या लाटांमध्ये शिरली आणि विठूच्या नावाचा गजर करताकरता प्रत्येकाला आनंदाचा कढ आला! झरणारे डोळे आणि खिळलेले पाय...  ‘संमेलन संपले आहे, आता घरी परतायचे ‘याचेही भान हरवून गेले होते. आता २०२६ साली बीएमएमचे पुढील संमेलन सिएटल येथे होईल !

Web Title: The twenty-first Brihanmaharashtra Mandal session, which lasted for four days, came to a grand conclusion.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.