अमेरिकेतील चर्चेत भारताचाच बाेलबाला; ‘एस-४००’ यंत्रणेवर चर्चा अमेरिकेने टाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 09:01 AM2022-04-19T09:01:34+5:302022-04-19T09:02:38+5:30
मंत्रीस्तरीय चर्चेमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. दाेन्ही मंत्र्यांच्या अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटाेनी ब्लिंकन आणि संरक्षण मंत्री लाॅयड ऑस्टीन यांच्यासाेबत बैठका झाल्या; मात्र काेणत्याही बैठकीत एस-४०० यंत्रणेचा मुद्दा उपस्थित करण्याचे अमेरिकेने टाळले.
नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये नुकतीच २ प्लस २ मंत्रीस्तरीय चर्चेची फेरी पार पडली. भारताने युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाच्या विराेधात भूमिका घेण्यासाठी अमेरिका सातत्याने दबाव टाकत आहे; मात्र या चर्चेदरम्यान भारताने अमेरिकेला विविध मुद्द्यांवर जाेरदार प्रत्युत्तर दिले; पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताचा पवित्रा पाहून अमेरिकेने एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी व्यवहाराचा मुद्दा या चर्चेत उपस्थित करण्याचे टाळले.
मंत्रीस्तरीय चर्चेमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. दाेन्ही मंत्र्यांच्या अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटाेनी ब्लिंकन आणि संरक्षण मंत्री लाॅयड ऑस्टीन यांच्यासाेबत बैठका झाल्या; मात्र काेणत्याही बैठकीत एस-४०० यंत्रणेचा मुद्दा उपस्थित करण्याचे अमेरिकेने टाळले. भारताने रशियाकडून एस-४०० संरक्षण यंत्रणा विकत घेतली आहे. अमेरिकेने या व्यवहारावर यापूर्वी आक्षेप घेतला आहे; मात्र अमेरिकेने यावरून भारतावर निर्बंध लादलेले नाही. चर्चेमध्ये रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा झाली; मात्र अमेरिकेने भारताच्या भूमिकेवरून काेणतेही कठाेर वक्तव्य करण्याचे टाळले.
सावध पवित्रा...
- अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी, तसेच लष्करी सहकार्याच्या मुद्द्यावरून भारतविराेधी भूमिका घेतली हाेती.
- उपसुरक्षा सल्लागार दलीप सिंह यांनी भारत भेटीवर असताना चीनचा हवाला देऊन रशियाबाबत इशारा दिला हाेता. यावर भारताने अमेरिकेच्या भूमिवरच प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे अमेरिकेलाही सावध पवित्रा घ्यावा लागला आहे.