Imran Khan, Pakistan Crisis: पाकिस्तानात हलकल्लोळ सुरूच, देशात 'मार्शल लॉ' लागणार का.. पाक आर्मी काय म्हणते?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 09:16 PM2023-05-13T21:16:30+5:302023-05-13T21:17:24+5:30
पाकिस्तानी माजी पंतप्रधान इम्रान खानच्या अटकेपासून देशभरात रणकंदन माजले आहे
Imran Khan Arrest, Pakistan Army Martial Law: पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खानच्या अटकेच्या दिवसापासून एकच हलकल्लोळ माजला आहे. इम्रान खानच्या अटकेमुळे चार दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय गदारोळ काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये लष्करी कायदा म्हणजेच मार्शल लॉ लागू होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र आता लष्कराकडून या संदर्भात विधान करण्यात आले आहे. देशातील राजकीय संकट आणि बिघडत चाललेली कायदा व सुव्यवस्था या गोष्टींमध्ये लष्करी राजवट लागू होण्याच्या शक्यतेबाबत पाकिस्तानी लष्कराने महत्त्वाचे विधान केले आहे.
मार्शल लॉ चा प्रश्नच उद्भवत नाही. पाक लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यासह संपूर्ण लष्कर नेतृत्वाचा लोकशाहीवर विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष खान यांच्या अटकेमुळे सुमारे चार दिवसांच्या राजकीय गोंधळानंतर महासंचालक इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी हे वक्तव्य केले आहे. या दरम्यान रावळपिंडीतील जनरल मुख्यालयासह अनेक लष्करी संस्थांना लक्ष्य करण्यात आले. चौधरी यांनी जिओ न्यूजला सांगितले की, देशात लष्करी राजवट लागू करण्याचा प्रश्नच येत नाही.
पाक लष्कर काय म्हणाले?
मेजर जनरल चौधरी म्हणाले की, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि संपूर्ण लष्करी नेतृत्वाचा लोकशाहीवर विश्वास आहे. लष्कराचे ऐक्य अतूट असून ते देशासाठी स्थिरता आणि सुरक्षेचा आधारस्तंभ म्हणून काम करत राहील. अंतर्गत कुरबुरी आणि बाह्य शत्रू असूनही लष्कर एकसंध आहे. पाकिस्तानी सैन्यात फूट पाडण्याचे स्वप्न स्वप्नच राहील, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली सेना एकजूट आहे आणि राहील.
दुसरीकडे, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी 9 मे रोजी झालेल्या अटकेसाठी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना जबाबदार धरले आहे. इम्रान म्हणाले, यामागे सुरक्षा एजन्सी नाहीत, पण एक माणूस आहे, तो लष्करप्रमुख आहे. लष्करात लोकशाही नाही. जे काही घडत आहे त्यामुळे लष्कराची प्रतिमा मलीन होत आहे. शुक्रवारी एका भ्रष्टाचार प्रकरणात दिलासा देताना उच्च न्यायालयाने इम्रानच्या अटकेवर दोन आठवड्यांची बंदी घातली.