परस्पर संवाद, मुत्सद्देगिरीतूनच शांततेचा मार्ग जातो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 07:02 AM2024-06-15T07:02:35+5:302024-06-15T07:03:20+5:30
Narendra Modi in G7 Summit: इटलीतील दक्षिणेकडील बारी शहरातील विशाल रिसॉर्ट शहरात सुरू झालेल्या जी-७ राष्ट्रांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धग्रस्त युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना, शांततेचा मार्ग संवाद, मुत्सद्देगिरी यातूनच जातो, असा सल्ला दिला.
बारी (इटली) - इटलीतील दक्षिणेकडील बारी शहरातील विशाल रिसॉर्ट शहरात सुरू झालेल्या जी-७ राष्ट्रांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि बिट्रनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी धोरणात्मक संबंध वृद्धिंगत करण्यावर चर्चा केली. युद्धग्रस्त युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना, शांततेचा मार्ग संवाद, मुत्सद्देगिरी यातूनच जातो, असा सल्ला दिला.
मोदी यांची मॅक्रॉन यांच्यासोबत ही एका वर्षातील चौथी बैठक ठरली. त्यांनी संरक्षण, आण्विक क्षेत्रात धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या मार्गावर चर्चा केली. मोदी यांनी त्यांचे ब्रिटिश समकक्ष ऋषी सुनक यांची भेट घेतली आणि एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत-ब्रिटन रणनीतीक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर दिला.
जी-७ शिखर परिषदेच्या कार्यक्रमात जागतिक नेत्यांबरोबर पॅराग्लायडिंग पाहताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह इतर नेते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. या दरम्यान पोप फ्रान्सिस परिषदेत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची गळाभेट घेतली.
मेलोनी यांचा 'नमस्ते' व्हिडीओ व्हायरल
जी-७ शिखर परिषदेत बहिःस्थ देश म्हणून सहभागी झालेल्या भारताचे पंतप्रधान मोदी यांचे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी 'नमस्ते' म्हणून स्वागत केले. एवढेच नाही, तर इतर देशांच्या नेत्यांचे भारतीय पद्धतीने स्वागत केले. त्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
जो बायडेन भरकटले, मेलोनींनी आणले...
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन जी-७ शिखर परिषदेच्या कार्यक्रमात जागतिक नेत्यांबरोबर असताना, भरकटले गेले. काही वेळ ते गोंधळात पडले. ऋषी सुनक, टुडो, इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मन चान्सलर ओलुफ स्कोल्झ इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींसोबत पॅराग्लायडिंग पाहत होते. बायडेन भरकटून दूर गेले हे लक्षात येताच मेलोनी यांनी त्यांना परत आणले.