अख्ख्या गावानं दुकान विकत घेतलं, आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 10:17 AM2023-09-13T10:17:56+5:302023-09-13T10:20:06+5:30
एखाद्या छोट्याशा गावातलं एकटं दुकटं किराणा दुकान हे फक्त दुकान नसतं. गावातल्या लोकांच्या वाण सामानाच्या गरजा पुरवता पुरवता ते दुकान गावाचं आधार होतं. गावाची ओळख होतं. ते दुकान मग फक्त दुकान राहात नाही, गावातल्या लोकांसाठी ते जिवाभावाच्या माणसापेक्षा कमी नसतं.
एखाद्या छोट्याशा गावातलं एकटं दुकटं किराणा दुकान हे फक्त दुकान नसतं. गावातल्या लोकांच्या वाण सामानाच्या गरजा पुरवता पुरवता ते दुकान गावाचं आधार होतं. गावाची ओळख होतं. ते दुकान मग फक्त दुकान राहात नाही, गावातल्या लोकांसाठी ते जिवाभावाच्या माणसापेक्षा कमी नसतं. गावातल्या दुकानांना मिळणारा हा जिव्हाळा शहरातल्या छोट्या-मोठ्या काॅलनीत उभ्या असणाऱ्या दुकानांनाही मिळाला. पण, माॅल सुपर मार्केटच्या रेट्यात अशी अनेक दुकानं बंद झाली. हे होणारच असं मान्य करत नव्या मार्केटशी लोकांनी स्वत : ला जोडून घेतलं. जुळवून घेतलं.
हे वास्तव आज कोण्या एका गावाचं आणि शहराचं नाही ते जगभराचं आहे. पण, या वास्तवाशी फटकून वागणारं एक गाव आहे. त्या गावातलं एक दुकान आहे. त्या दुकानाची ही गोष्ट. या दुकानाचं नाव राॅयल सुपर मार्ट. अमेरिकेतल्या इलिनाॅइस राज्यातल्या शेफिल्ड या छोट्याशा गावातलं हे दुकान. हे दुकान ६९ वर्षांच्या जाॅॅन विंगर यांनी विकायला काढलं होतं. पण या दुकानाच्या नशिबात मात्र काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं.
१९४० साली जाॅन विंगर यांच्या वडिलांनी शेफिल्ड या छोट्याशा गावात हे दुकान सुरू केलं. पुढे १९८५ मध्ये या दुकानाचा वारसा जाॅन विंगर यांच्याकडे आला. आपण जसा आपल्या वडिलांचा वारसा चालवला तसा वारसा आपली मुलं चालवतील असं त्यांना वाटलं. पण, ते झालं नाही. एकट्यानं दुकान चालवणं मग ६९ वर्षांच्या जाॅन यांना अवघड वाटू लागलं. कुटुंबातून कोणीच हे दुकान चालवायला पुढे येत नसल्याचं बघून जाॅन यांनी हे दुकान विकायला काढलं. पण, नंतर त्यांनी हा विचार केला की, जर विकत घेणाऱ्याने हे दुकान नीट चालवलं नाही तर गावातल्या लोकांची गैरसोय होईल. लोकांना वाणसामानासाठी १५ मैल दूर जावं लागेल. वयस्कर लोकांची किती मोठी गैरसोय होईल, या विचाराने त्यांनी आपलं दुकान विकण्याचा निर्णय मागे घेतला. रडतखडत जाॅनच दुकान चालवत राहिले. पण, त्यांची ही कोंडी शेफिल्डमध्ये राहाणाऱ्या एलिझाबेथ प्रॅट यांनी ओळखली. हा माणूस केवल लोकांची गैरसोय होवू नये म्हणून झेपत नसतानाही दुकान चालवता आहे हे बघून त्या जाॅन यांच्या मदतीसाठी पुढे आल्या.
एलिझाबेथ शेफिल्ड येथे ना नफा तत्त्वावर ‘काॅर्नस्टोन कम्युनिटी वेलनेस सेंटर’ चालवतात. त्यांनी जाॅन यांच्या राॅयल सुपर मार्टसाठी पैसे उभे करायचे ठरवले. शेफिल्डमध्ये राहाणाऱ्या लोकांना देणगी देण्यासाठी आवाहन केलं. पैसे जमा करून या छोट्याशा दुकानाचं आपण अधिक सुविधा आणि पर्याय देणारं सुपर मार्केट करू अशी एलिझाबेथ यांची कल्पना होती. एलिझाबेथ यांच्या या आवाहनाला शेफिल्डमधल्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. काही महिन्यांतच शेफिल्डमधल्या नागरिकांनी ५ लाख डाॅलर्स जमा केले. हे एवढे पैसे दुकान विकत घेऊन सुधारण्यासाठी पुरेसे होते. एका दुकानासाठी लोक एकजूट झाले होते.
आता हे दुकान संपूर्ण शेफिल्ड गावाच्या मालकीचं झालं. दुकानातला माल वाढला, त्यात लोकांच्या बदलत्या गरजांचा विचार करून नवीन पर्यायही ठेवले गेले. दुकान सामान आणि सुविधेसह विस्तारलं. दुकानाचं नाव होतं तेच राहिलं. आता हे दुकान केवळ लोकांच्या वाण सामानाच्या गरजा पुरवत नाही तर शेफिल्डमधले लोक या दुकानात एकत्र येतात, एकमेकांना भेटतात. येथील लोकांनी केवळ दुकानासाठी देणगीच दिली नाही तर शेफिल्डमधल्या नागरिकांनी मिळून या दुकानाची जबाबदारीही घेतली आहे. आता केवळ किराणा दुकान एवढंच या राॅयल सुपर मार्टचं अस्तित्त्व नाही. या दुकानानं एकीची शक्ती काय असते, हे येथील लोकांना शिकवलं. राॅयल सुपर मार्ट आता शेफिल्डमधल्या लोकांना मानसिक आनंद आणि समाधान देणारी जागा झाली आहे. इथल्या लोकांची सांस्कृतिक ओळख झाली आहे. हे दुकान जर बंद झालं असतं तर, आपल्या गरजांसाठी आपल्याला दुसऱ्या शहरातल्या दुकानांवर अवलंबून राहावं लागलं असतं. पण, या दुकानामुळे आपल्या छोट्या गावाचं स्वावलंबन जपलं गेल्यामुळे शेफिल्डमधली लोकं खूप खुश आहेत, स्वत: वर, गावावर आणि आपल्या दुकानावरही!
आमचं दुकान, आमची जबाबदारी !
संपूर्ण अमेरिकेतच ग्रामीण भागातील वैयक्तिक मालकीची छोटीछोटी दुकानं बंद होत आहेत. १९९० ते २०१५ पर्यंत ३९ टक्के छोटी दुकानं बंद झाली. पण, आपल्या गावातलं, शहरातलं एकमेव दुकान बंद होऊ नये म्हणून शेफिल्डप्रमाणे कन्सास राज्यातील एरी, टेक्सासमधील ऑक्सटेल या गावातले लोक एकत्र आले. त्यांनी आपल्या परिसरातली दुकानं वाचवण्यासाठी पैसे दिले, वेळ दिला. दुकानं चालवण्याची जबाबदारी स्वीकारली. एका वाणसामानाच्या दुकानांना कम्युनिटी स्टोअर ही नवीन सशक्त ओळख दिली.