खुला झाला जगातील सर्वांत लांब काचेचा पूल, चीनवर केली मात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 11:30 AM2022-05-04T11:30:41+5:302022-05-04T11:31:44+5:30
पुलासाठी फ्रेंच उत्पादकांनी बनवलेल्या खास टेम्पर्ड ग्लासचा वापर करण्यात आला आहे. ही काच इतकी मजबूत आहे की या काचेच्या पुलावर एकावेळी ४५० लोक चालू शकतात. २,०७३ फूट लांब, ४९२ फूट उंची
बऱ्याच लोकांना उंचीची भीती वाटते, त्यामुळे अनेकजण उंच इमारतीच्या बाल्कनीवर किंवा टेरेसवर उभे राहणे टाळतात. काहींना तर उंचीची इतकी भीती वाटते की ते विमानातही कधी बसत नाहीत. व्हिएतनाममध्ये सुरू झालेला काचेचा पुल बघून अशा लोकांच्या हृदयाचे ठोके नक्कीच वाढतील. व्हिएतनामने शुक्रवारी जगातील सर्वात लांब काचेचा पुल सर्वसामान्यांसाठी खुला केला आहे. 'बाख लांब पादचारी पूल' असे या पुलाचे नाव असून त्याचा इंग्रजीत अर्थ 'व्हाइट ड्रॅगन' असाही होतो.
हा जगातील सर्वात लांब काचेचा पूल असून येत्या काही आठवड्यांमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही याची नोंद होणार आहे. चीनच्या गुआंगडॉन्ग भागात अशा प्रकारचाच १७२५ फूट लांब पूल आहे.
काचेमुळे, पर्यटकांना पुलाच्या आजूबाजूचे सौंदर्य सहज पाहता येते, तथापि, त्यावर चालणारे काही लोक कधीकधी इतके घाबरतात की ते खाली पाहण्याची हिंमतही करत नाहीत.