चिनी नौदलाच्या हाती जगातील सर्वात शक्तीशाली कॉईल गन, एअर डिफेंस सिस्टिमलाही भेदू शकते
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 11:21 AM2023-08-26T11:21:24+5:302023-08-26T11:21:38+5:30
चीनचे नौदल आणि पीएलए या विनाशकारी गनची चाचणी घेत आहे.
बिजिंग : चिनी नौदलाच्या हाती जगातील सर्वात शक्तीशाली कॉईल गन लागली आहे. ही गन एवढी शक्तीशाली आहे की 3540 किमी प्रति तासाच्या वेगाने मिसाईलच्या आकाराचे गोळे डागू शकणार आहे. या खतरनाक शस्त्राला भविष्यातील शस्त्र संबोधले जात आहे. यामुळे समोर युद्धनौका असुदे की पानबुडी कोणीही वाचू शकणार नाही, असे सांगितले जात आहे.
चीनचे नौदल आणि पीएलए या विनाशकारी गनची चाचणी घेत आहे. या गनमधील इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाँचर मिसाईलला एवढा वेग प्रदान करतात की तो काही हजार किमी एवढा असतो. पहिल्याच प्रयत्नात १२४ किलोच्या तोफ गोळ्याने ०.०५ सेकंदांत ७०० किमी प्रति तास एवढा प्रचंड वेग घेतला होता, असे या चाचणीशी संबंधीत लोकांनी सांगितले.
आतापर्यंत जगातील कोणीच एवढ्या मोठ्या तोफगोळ्याला फायर केले नाहीय. जर ही कॉईल गन चीनच्या नौदलाला मिळाली तर चीन कित्येक मैल अंतरावरून शत्रूच्या ठिकाणांवर फायरिंग करू शकते. अशा गोळ्याला शोधणे आणि एअर डिफेंस सिस्टिमद्वारे पाडणे खूप कठीण असते.
कॉइल गनला गॉस गन किंवा चुंबकीय प्रवेगक असेही म्हणतात. बॅरलमध्ये अनेक इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल लावण्यात आले आहे. हे शस्त्र चिनी सशस्त्र दलांना युद्धाचे स्वरूप बदलण्यास मदत करेल, असे या प्रकल्पाचे प्रमुख प्रोफेसर गुआन झियाओकून यांनी सांगितले. या कॉइल गनची चाचणी करताना मिळालेल्या अनुभवाचा उपयोग पृथ्वीजवळील उपग्रह आणि हाय-स्पीड रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.