जगातील सर्वाधिक श्रीमंत इलॉन मस्क ‘बेघर’!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 10:49 AM2024-08-23T10:49:47+5:302024-08-23T10:50:59+5:30

इलॉन मस्क हे कायमच जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या, दुसऱ्या.. स्थानी असतात.

The world's richest Elon Musk 'homeless'! | जगातील सर्वाधिक श्रीमंत इलॉन मस्क ‘बेघर’!

जगातील सर्वाधिक श्रीमंत इलॉन मस्क ‘बेघर’!

टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्सचे मालक, जगातील गर्भश्रीमंतांपैकी एक असलेले इलाॅन मस्क कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या विवाहबाह्यसंबंधांमुळे, कधी त्यांच्या लग्नांमुळे, कधी त्यांच्या मुलांच्या संख्येमुळे, कधी त्यांच्या मुलांच्या नावांमुळे, कधी त्यांच्या वक्तव्यांमुळे, तर कधी त्यांच्या कृतीमुळे.. खरंतर त्यांनी काहीही केलं किंवा काहीही केलं नाही तरी ती बातमी होते आणि लोकांमध्ये त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. 

इलॉन मस्क हे कायमच जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या, दुसऱ्या.. स्थानी असतात. त्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे, की सर्वसामान्य माणूस त्याची कल्पनाही करू शकणार नाही. सर्वसामान्य माणूस हजारो वर्षांतही त्यांच्याइतकी संपत्ती कमवू शकणार नाही. त्यांच्या संपत्तीत रोजच वाढ होत असते. अगदी आकडेवारीत आणि भारतीय रुपयांतच सांगायचं झालं तरी २०२२ मध्ये मस्क यांच्याकडे २१ लाख कोटी रुपयांची संपत्ती होती. त्यात आता आणखी किती वाढ झाली असेल, याचा आपापल्या कुवतीप्रमाणे आपण फक्त अंदाजच बांधू शकतो. सगळ्याच आलिशान गोष्टींचे शौकीन असणाऱ्या मस्क यांच्याकडे किती घरं असतील? एक, दोन, तीन, पाच, दहा.. काय अंदाज आहे तुमचा? 

नाही ना सांगता येत?.. जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेला हा माणूस सध्या तरी ‘बेघर’ आहे! कारण त्यांच्याकडे असलेलं शेवटचं घरही त्यांनी विकून टाकलं आहे ! १६ हजार स्क्वेअर फुटांतील हा आलिशान महाल विकून सध्या ते एका छोट्याशा दोन बेडरूमच्या भाड्याच्या घरात राहताहेत! का विकलं त्यांनी घर? भाड्याच्या घरात त्यांना का राहावं लागतंय? ते ‘गरीब’ झाले? धंद्यात घाटा झाला? मोठं घर त्यांना आता परवडत नाही? - तर असलं काहीही नाही. तुम्ही तुमचं घर का विकलंत असं विचारल्यावर एकाच शब्दांत ते सांगतात.. स्वातंत्र्य!

मला सगळ्याच गोष्टींपासून स्वातंत्र्य हवं होतं, अगदी स्वत:च्याच घरापासूनदेखील! त्यामुळेच मी हे घर विकलं. इलाॅन मस्क यांचं हे घर सिलिकॉन व्हॅलीमधील सर्वाधिक आलिशान घर मानलं जातं. गेल्या काही वर्षांपासून हे घर विकायचं त्यांच्या मनात होतं. एखाद्या मोठ्या कुटुंबानं हे घर विकत घ्यावं असं मस्क यांना वाटत होतं. प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांना या घरासाठी खरेदीदार मिळाला. सुरुवातीला या घराची किंमत त्यांनी ३७.५ दशलक्ष डॉलर इतकी ठेवली होती. नंतर त्यांनी त्यात कपात करून अपेक्षित किंमत सुमारे ३२ दशलक्ष डॉलर इतकी ठेवली होती. 

४७ एकर इतक्या प्रशस्त परिसरात १९१२ मध्ये तयार झालेलं हे घर होतं. या घरात सात अतिशय मोठ्या आणि प्रशस्त अशा सात बेडरुम्स होत्या. साडेनऊ बाथरूम होते. याशिवाय अतिशय आलिशान हॉल, किचन, म्युझिक रूम.. असं बरंच काही होतं. शंभर वर्षांपेक्षाही अधिक काळ पाहिलेल्या  घरात उद्यानापासून ते विविध खेळांच्या मैदानासह अनेक गोष्टी होत्या. त्यात काय नाही, असाच प्रश्न अनेकांना पडावा! इलॉन मस्क यांनी २०१७ मध्ये २३.४ दशलक्ष डॉलर्सना हे घर खरेदी केलं होतं. त्यानंतर त्यांनी त्यात अनेक बदलही केले होते. अर्थात त्यांच्याकडे हे एकमेव घर होतं अशातली गोष्ट नाही.

याआधी आणखी सहा आलिशान घरं त्यांनी विकली आहेत. त्यांचं पहिलं घर १६,२५१ चौरस फुटांचं होतं. त्यात सहा बेडरूम आणि ११ बाथरूम होते. फ्रान्सच्या वास्तुशैलीत त्यांनी हे घर रूपांतरित केलं होतं. त्यात दोन मजली पुस्तकालय, वाइन सेलर, टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल.. अशा अनेक गोष्टी होत्या. हे घर त्यांनी २९ दशलक्ष डॉलर्सना विकलं होतं. दुसरं घर १२,८०० स्क्वेअर फुटांचं होतं. त्यात पाच बेडरूम, चार बाथरूम होत्या. प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता जीन वाइल्डर यांचं ते घर होतं. हॉलीवूडच्या समृद्ध इतिहासासाठीही हे घर नावाजलं जात होतं. लॉस एंजेलिस येथील अशीच चार आलिशान घरं एकमेकांच्या जवळ होती. ही सारी घरं काही काळापूर्वी इलॉन मस्क यांनी विकून टाकली. 

दोन बेडरूमचं छोटंसं भाड्याचं घर! 
आपली सगळी घरं विकल्यानंतर इलॉन मस्क आता टेक्सासमधील बोका चिका येथील एका छोट्याशा दोन बेडरूमच्या भाड्याच्या घरात राहतात. त्याची किंमतही केवळ ५० हजार डॉलर्स आहे. तिथेच त्यांचं स्पेसएक्सचं मुख्यालय आहे. खरंतर हे घर म्हणजे वीस बाय वीस फुटांचा एका ‘फोल्डेबल’ स्टुडिओ आहे. त्यात एक मोठा हॉल, बेडरूम, किचन, बाथरूम आहे. गरजेप्रमाणे त्यात बदलही करता येऊ शकतो. अंतराळात वस्ती करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मस्क यांनी कदाचित त्यामुळेच पृथ्वीवरील आपली घरं विकली असावीत!

Web Title: The world's richest Elon Musk 'homeless'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.