चीनने विणलेल्या जाळ्यात त्यांचीच पाणबुडी अडकली; ५५ नौसैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 04:21 PM2023-10-04T16:21:41+5:302023-10-04T16:21:50+5:30
अमेरिकेच्या पाणबुड्यांना अडकविण्यासाठी शांघाय प्रांताच्या शानडोंग परिसरात जाळे लावले होते.
चीनची आण्विक पाणबुडी बुडाल्याचे वृत्त आहे. अशातच ब्रिटनच्या गुप्तहेर संघटनेने मोठा खुलासा केला आहे. चीनच्या ५५ नौसैनिकांचा पिवळ्या समुद्रात पाण्याखाली श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे या संस्थेने म्हटले आहे. नेहमीप्रमाणे चीनने या घटनेवर चुप्पी साधली आहे.
हे सर्व नौसैनिक आण्विक पाणबुडीमध्ये होते. चीनने अमेरिकेच्या पाणबुड्यांना अडकविण्यासाठी शांघाय प्रांताच्या शानडोंग परिसरात जाळे लावले होते. यामध्ये चीनचीच पाणबुडी अडकल्याचे सांगितले जात आहे. यावेळी पाणबुडीतील ऑक्सिजन बनविणारी यंत्रणा खराब झाली आणि सर्व नौसैनिकांचा मृत्यू झाला. ही घटना आताची नसून २१ ऑगस्टची असल्याचे सांगितले जात आहे.
पीएलए नेव्ही पाणबुडी '093-417' चा कॅप्टन आणि इतर 21 अधिकारीही या दुर्घटनेत ठार झाले आहेत. चिनी अधिकाऱ्यांनी याबाबत मौन बाळगले आहे. आण्विक पाणबुडीच्या दुर्घटनेनंतरही चीनने जगाकडून बचावासाठी कोणतीही मदत मागितली नाही, असे काही वृत्तांमध्ये म्हटले आहे.
चीनने पाणबुडी बुडल्याच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या. तैवाननेही अशी कोणतीही घटना झाल्याचे नाकारले होते. पाणबुडीच्या बॅटरी सुरु असताना ते जाळ्यात अडकले असतील तर त्यांची आतील हवा शुद्धीकरण यंत्रणा निकामी झाली असेल. पाणबुडीत एक किट असते जे कार्बन डायऑक्साइड शोषून घेते आणि ऑक्सिजन देखील तयार करते. जगातील इतर देशांकडे हे तंत्रज्ञान नसण्याची शक्यता आहे, असे ब्रिटिश पाणबुडीच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.