...तर मृतदेह तीन दिवस चौकात लटकवा! मुशर्रफ यांना कोर्टाने दिला हाेता मृत्यूदंड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 10:53 AM2023-02-06T10:53:51+5:302023-02-06T10:54:22+5:30
जर मुशर्रफ यांचा शिक्षेपूर्वी मृत्यू झाला तर त्यांचा मृतदेह तीन दिवस इस्लामाबादमधील डी चौकात लटकविण्यात येईल, असे या निर्णयात म्हटले होते. मात्र, नंतर लाहोर उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द केली.
परवेज मुशर्रफ यांना २०१९मध्ये इस्लामाबादमधील विशेष न्यायालयाने संविधान बदलल्याच्या देशद्रोहाच्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती. देशाच्या इतिहासात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले ते पहिले लष्करी शासक होते. जर मुशर्रफ यांचा शिक्षेपूर्वी मृत्यू झाला तर त्यांचा मृतदेह तीन दिवस इस्लामाबादमधील डी चौकात लटकविण्यात येईल, असे या निर्णयात म्हटले होते. मात्र, नंतर लाहोर उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द केली.
निष्फळ ठरलेली मुशर्रफ-अडवाणी भेट
४ जुलै २००१ रोजी आग्रा येथे भारत-पाकिस्तान परिषदेची पार्श्वभूमी तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी तयार केली होती. आग्रा परिषदेत मुशर्रफ आणि अडवाणी यांच्यात चर्चेची पहिली फेरी झाली. त्यात दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमध्ये लपून बसलेल्या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे मान्य केले होते.
यानंतर अडवाणी यांनी या कराराची औपचारिक अंमलबजावणी होण्यापूर्वी तुम्ही १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असलेल्या दाऊद इब्राहिमला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी केली, ती अर्थातच हट्टी मुशर्रफ यांनी अमान्य केली.
भारतासोबत महत्त्वाचे टप्पे -
-जून १९६४ : मुशर्रफ पाकिस्तान सैन्यात दाखल.
-भारताविरुद्धच्या १९६५ आणि १९७१च्या युद्धात त्यांनी भाग घेतला होता.
-१९९८ मध्ये लष्करप्रमुखपदी निवड.
-मुशर्रफ यांनी कारगिल युद्धासाठी मैदान तयार केले. तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांचे भारतीय समकक्ष अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत लाहोरमध्ये ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर युद्धाला सुरुवात झाली.
-या युद्धात त्यांना पराभव पत्करावा लागल्याने जगभरात पाकिस्तानची नाचक्की.
मुशर्रफ यांचे दिल्लीतील निवासस्थान.
-ऑक्टोबर १९९९ : पंतप्रधान नवाझ शरीफ यांची हकालपट्टी करून मुख्य कार्यकारी म्हणून पदभार स्वीकारला.
-जून २००१ : तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद रफिक तरार यांच्या राजीनाम्यानंतर मुशर्रफ यांनी स्वत:ला पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केले.
-जुलै २००१ : मुशर्रफ-पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यात आग्रा परिषद. जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर करार होऊ न शकल्याने परिषद अयशस्वी.
-जानेवारी २००४ : पंतप्रधान वाजपेयी यांनी इस्लामाबाद येथे १२व्या सार्क परिषदेत मुशर्रफ यांच्याशी थेट चर्चा केली अन् संवादाची प्रक्रिया सुरू झाली.