...तर मोदी प्रतिहल्ला करू शकतात
By admin | Published: February 7, 2015 02:38 AM2015-02-07T02:38:17+5:302015-02-07T02:38:17+5:30
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असेल तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकवर लष्करी हल्ला करतील असे अमेरिकेच्या एका माजी मुत्सद्याने म्हटले
अमेरिकेचा पाकला इशारा : परिस्थिती बदलली; यापुढे गैरवर्तन सहन होणे अशक्य
वॉशिंग्टन : भारतावर यापुढे होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असेल तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकवर लष्करी हल्ला करतील असे अमेरिकेच्या एका माजी मुत्सद्याने म्हटले असून, यापुढे पाकचे असे गैरवर्तन सहन केले जाणार नाही असा इशारा दिला आहे.
अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रॉबर्ट ब्लॅकविल यांनी हे वक्तव्य केले आहे. १५ वर्षांपूर्वी नवी दिल्ली येथे भारताच्या संसदेवर हल्ला झाला. त्यानंतर ज्या ज्या वेळी भारतावर असे दहशतवादी हल्ले झाले, त्या प्रत्येक वेळी तत्कालीन भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याचा विचार केला; पण नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला; पण आता भारतातील वातावरण बदलत आहे, त्याबरोबरच नागरिकांच्या भावनाही बदलल्या आहेत, आता भारताच्या पंतप्रधानांनी पाकवर लष्करी कारवाई करण्याचा विचार केला, तर ते मागे हटणे शक्य नाही.
अमेरिकेतील कौन्सिल आॅन फॉरेन रिलेशन्स या संस्थेतर्फे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. भारतात यापुढे एखादा मोठा दहशतवादी हल्ला झाला आणि त्याचा संबंध पाकिस्तानी लष्कर व आयएसआयशी असेल तर भारताचे पंतप्रधान पाकिस्तानवर लष्करी कारवाई करतील.(वृत्तसंस्था)
४मोदींच्या पुर्वपदस्थ नेत्यांना भारतीय लष्कराने नेहमीच लष्करी हल्ल्याचा पर्याय सुचविला होता; पण त्यांनी हा निर्णय घेतला नाही. आता मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, भारतीय जनमानसाचे मत व भारतीय समाजाच्या भावना लक्षात घेतल्या तर मोदी पाकला धडा शिकवतील हे नक्की आहे, असे ब्लॅकविल म्हणाले. भारत व दक्षिण आशियातील परिस्थितीवर ब्लॅकविल लक्ष ठेवून आहेत.