'...तर पुढचा नंबर युरोपचा असेल', हमाससोबत युद्ध सुरू असतानाच इस्रायली पंतप्रधान थेटच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 03:20 PM2023-11-07T15:20:21+5:302023-11-07T15:20:51+5:30
"विजयाला पर्याय नाही. आम्ही हमासचा पराभव करू, आम्ही हमास नष्ट करू. आम्ही जिंकू आणि या प्रयत्नात सर्व सभ्य शक्तींनी आमचे समर्थन करावे, अशी आमची इच्छा आहे."
गेल्या एक महिन्यापासून हमास आणि इस्रायल यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. इस्रायल गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर जबरदस्त हवाई आणि जमिनीवर हल्ले करत आहे. यातच, ही लढाई सभ्यता आणि निर्देयता यातील आहे. जर मध्यपूर्व दहशतवादाच्या टार्गेटवर आले, तर पुढचा क्रमांक युरोपचा असेल आणि कुणीही सुरक्षित राहणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे.
हमासने गेल्या 7 ऑक्टोबरला जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असलेल्या इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात 1400 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हमास समूळ नष्ट होईपर्यंत युद्धाची घोषणा केली. यातच, दहशतवादाची धुरा इराणच्या नेतृत्वाखाली आहे. यात हिजबुल्लाह, हमास, हुथी आदिंचा समावेश असल्याचेही नेतन्याहू यांनी म्हटले आहे.
ही एक जागतिक लढाई -
नेतन्याहू म्हणाले, ही स्थानिक लढाई नाही, तर हे जागतिक युद्ध आहे. या लोकांना पराभूत करणे अत्यंत आवश्यक आहे. हीच लढाई आता आम्ही गाझात हमासविरुद्ध लढत आहोत. विजयाला पर्याय नाही. आम्ही हमासचा पराभव करू, आम्ही हमास नष्ट करू. आम्ही जिंकू आणि या प्रयत्नात सर्व सभ्य शक्तींनी आमचे समर्थन करावे, अशी आमची इच्छा आहे.
गाझाचा जगाशी संपर्क तोडला -
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात १० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्याने सोमवारी पहाटे संपूर्ण गाझा शहराला वेढा घात हमासचा वरचष्मा असलेल्या उत्तर गाझाचा तेथील अन्य ठिकाणांसोबत असलेला संपर्क तोडला आहे. इस्रायलने कोंडी केल्यामुळे गाझामध्ये इंधन, औषधी, अन्नधान्य अशा जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. तेथील शाळांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अख्यत्यारीतील संघटनांनी मदत छावण्या सुरू केल्या आहेत.