...तर रशिया-अमेरिकेचा थेट संघर्ष होणार; पुतिन यांच्या सरकारने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 06:18 AM2024-02-28T06:18:46+5:302024-02-28T06:19:01+5:30
युक्रेनच्या युद्धामुळे रशियाचे पाश्चिमात्य राष्ट्रांशी असलेले संबंध विकोपाला गेले आहेत.
मॉस्को : युक्रेनमध्ये लढण्यासाठी नाटोचे सदस्य असलेल्या युरोपीय देशांनी सैन्य पाठविल्यास अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटोशी आमचा संघर्ष होणे अपरिहार्य आहे, असा इशारा रशियाने दिला आहे.
युक्रेनच्या युद्धामुळे रशियाचे पाश्चिमात्य राष्ट्रांशी असलेले संबंध विकोपाला गेले आहेत. १९६२ साली क्युबाच्या क्षेपणास्त्र मुद्द्यावरून पाश्चिमात्य देश व रशियात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर इतकी बिकट स्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे.
नाटो व रशियामध्ये थेट युद्ध होऊ शकते, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी याआधीच दिला आहे. युरोपीय देशांनी आपले सैन्य युक्रेनमध्ये पाठवावे याकरिता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोमवारी सहमती दर्शविली. मात्र या विषयावर युरोपीय देशांमध्ये मतभेद आहेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
समुद्राखालील
केबल तोडल्या
तांबड्या समुद्रात पाण्याखालून जाणाऱ्या केबलची येमेनमधील हुती दहशतवाद्यांनी काही प्रमाणात नासधूस केली आहे. यामुळे आशियातील काही भाग आणि युरोपमधील काही भागात इंटरनेट कनेक्शन जाण्याची भीती आहे. या समुद्राच्या दक्षिणेकडील बाब अल-मंडाब सामुद्रधुनीतून इंटरनेट दळणवळणासाठी १५ केबलचे जाळे विणण्यात आले आहे. त्यांपैकी चार केबलची नासधूस करण्यात आली. त्यामध्ये ईआयजी, एएई-१, सीकॉम, टीजीएन-ईए या केबलचा समावेश आहे. त्यामुळे इंटरनेटवर परिणाम होण्याची भीती आहे.